अमरावती पालिकेत मोठा राजकीय ड्रामा, महापौर पदासाठी एमआयएमच्या नगरसेविकेने दिला भाजपला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीच्यावेळी मोठे राजकीय नाटय़ घडले. एमआयएमच्या नगरसेविकेने पक्षाने बजावलेला व्हिप मोडत महापौर पदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवित मतदान केले. दरम्यान, याची गंभीर दखल घेत पक्षादेश मोडणाऱया मीराताई कांबळे या नगरसेविकेची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

अमरावती महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत 12 नगरसेवक असणाऱया एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. पण, एमआयएमच्या एका नगरसेविकेने महापौरपदाचे भाजप उमेदवार श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान करून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना देखील पाठिंबा दिला.

असे घडले नाटय़

महापौरपदाच्या निवडीसाठी हात उंचावण्याची सूचना होताच महायुतीच्या नगरसेवकांसोबत मीराताई कांबळे यांनीही हात वर केला. त्यांची ‘चूक झाली असावी’ असा अंदाज घेत एमआयएम गटनेत्यांनी त्यांना हात खाली करण्यास सांगितले, मात्र त्यांनी नकार दिला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही त्यांनी आपला हात उंचावलेलाच ठेवला.

उमेदवार योग्य वाटल्याने मतदान – मीराताई कांबळे

मी माझे विचार मांडूनच मतदान केले. महापौर पदाचे उमेदवार योग्य वाटले, विकास करणारे वाटले म्हणून मी त्यांना मतदान केले. पक्षाकडून कारवाई जर झाली तर मार्ग भरपूर असतात, असे नगरसेविका मीराताई कांबळे यांनी म्हटले आहे.

नगरसेवक पदावर टांगती तलवार?

एमआयएमच्या गटनेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिपृत ‘व्हीप’ (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. मीराताई कांबळे यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे.