
टी-20 विश्वचषक सुरू होण्याच्या उंबरठय़ावरच हिंदुस्थानला पहिला झटका बसला आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
कर्णधार सूर्यकुमार यादवने आधीच धोक्याची घंटा वाजवली होती. राणाची स्थिती समाधानकारक दिसत नसल्याचे संकेत त्याने दिले होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पसंतीतील राणासाठी वेळेत तंदुरुस्त होणे कठीण ठरले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
अमेरिकेविरुद्ध शनिवारी विश्वचषकातील पहिला सामना खेळणाऱया हिंदुस्थानसाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो. पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, राणाला अद्याप अधिकृतपणे बाहेर काढले नव्हते. आमचे फिजिओ त्याचे मूल्यांकन करत होते. मात्र त्याची दुखापत चांगली दिसत नव्हती. आमच्याकडे उद्याच्या सामन्यासाठी अंतिम अकरा तयार आहेत. 15 खेळाडूंची संघरचना फार विचारपूर्वक केली जाते, त्यामुळे हा निश्चितच धक्का आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात राणाने एकच षटक टाकले होते, ज्यात त्याने 16 धावा दिल्या. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. राणा सुरुवातीच्या अंतिम संघात नसला तरी, विशिष्ट परिस्थितीत तो उपयुक्त पर्याय ठरू शकला असता. त्याने आतापर्यंत 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याचा इकॉनॉमी रेट 10.60 आहे.




























































