
>> डॉ. मंजिरी भालेराव
निसर्गसौंदर्याबरोबरच शिल्प आणि स्थापत्य यांचेही सौष्ठव जिथे उल्लेखनीय असते अशा ठिकाणांमध्ये पितळखोरा या स्थळाचे नाव प्रथम घेतले पाहिजे. गवताळा अभयारण्याच्या परिसरात असलेले हे ठिकाण म्हणजे धबधब्याच्या शेजारील खडकात दोन्ही बाजूला कोरलेल्या लेणी होत.
शैलगृह म्हणजे डोंगरातील घर. सर्वसाधारणपणे डोंगरातील घर म्हटल्यावर आपण डोंगर चढून तिथे जायचे आहे असा विचार करतो, पण क्वचित काही वेळेस आपण जर डोंगर माथ्यावर असू तर तो डोंगर खाली उतरून त्या शैलगृहात जावे लागते. अशा प्रकारची स्थळे तुलनेने कमी आहेत. त्यापैकी एक खूप महत्त्वाचे ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिह्यातील कन्नड या गावाजवळील पितळखोरे येथील लेणी. गवताळा अभयारण्याच्या परिसरात असलेले हे ठिकाण म्हणजे एका धबधब्याच्या शेजारील खडकात दोन्ही बाजूला कोरलेल्या लेणी होत. इथे धबधब्याच्या एका बाजूला 4 आणि दुसऱया बाजूला 10 लेणी आहेत. त्यामध्ये एका मोठय़ा चैत्यगृहाशिवाय इतर 3-4 गुंफांमध्ये स्तूप आहेत. त्यातील काही चैत्यगृहे, तर काही स्मारक स्तूप असावेत. इतर सगळे विहार आहेत, पण बहुतेकांची अवस्था बरीच खराब आहे. कारण इथला दगडही बराच ठिसूळ आहे. इथे पोहोचण्यासाठी खडकात आधी कोरलेल्या आणि नंतर बांधून काढलेल्या पायऱया आहेत. तसेच धबधब्याच्या पलीकडे जाण्यासाठी पुरातत्त्व खात्याने चांगला पक्का पूलही बांधला आहे.
इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ. स. चे 6 वे शतक एवढा मोठय़ा काळ इथे वस्ती होती. येथील सर्वच लेणी या पडक्या किंवा माती भरलेल्या अवस्थेत होत्या. 1959 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक म. न. देशपांडे यांनी चैत्यगृहाच्या परिसरात केलेल्या सफाई कार्यामुळे या लयन समूहातील बरेच महत्त्वाचे पुरावशेष उजेडात आले. त्यामध्ये अनेक सुटी शिल्पे, चैत्यगृह आणि विहाराचे भाग तसेच चैत्यगृहातील स्तूपाच्या आत ठेवलेल्या अस्थिकरंडकाचे भाग इ. चा समावेश होतो. चैत्यगृहाला लागूनच एक मोठा विहार आहे. त्याच्या समोर एक मोठे अंगण आहे. त्यामध्ये खऱया हत्तींच्या आकाराचे 9 हत्ती कोरले आहेत. त्यांच्या समोरच त्यांचे माहूतसुद्धा उभे होते असे दर्शवणारे काही अवशेष आहेत. याच अंगणातील माती काढल्यानंतर त्यातून अनेक कथनशिल्प आणि काही सुटी शिल्पे सापडली. या शोधामुळे पितळखोरा या लयणसमूहाचे महत्त्व अजूनच अधोरेखित झाले.
भाजे येथील चैत्यगृह जसे मोठय़ा आकाराचे, साधे अष्टकोनी स्तंभ असलेले, छताला लाकडी तुळया असलेले तसेच चैत्यगृहाला लाकडी मुखदर्शन असलेले होते तसेच पितळखोरा येथील चैत्यगृहही आहे. त्यामुळे अभ्यासकांनी याचा काळ ठरवताना त्याला भाज्याच्या चैत्यगृहाच्या जवळपास असलेला काळ असावा असे मत मांडले आहे. इ.स. पूर्व 2रे ते 1 ले शतक असा येथील चैत्यगृहाचा काळ मनाला जातो. पितळखोरा येथील चैत्यगृहातील लाकडी तुळया संपूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तसेच मुखदर्शनही तुटले आहे. ते कसे असावे याचा काहीही मागमूस आज तिथे नाहीये. शैलगृहांच्या बाजूने वाहणारा मोठा धबधबा आणि ठिसूळ खडक याचा हा परिणाम आहे, परंतु या चैत्यगृहाचे सगळ्यात मोठे वैशिष्टय़ म्हणजे येथील अर्धा बांधीव आणि अर्धा कोरीव स्तूप. त्याचा खालचा भाग हा खडकात कोरलेला आहे, तर वरचा अंडाकृती भाग हा बांधून काढला होता. खडकात कोरलेल्या भागाच्या वरच्या बाजूला अस्थिकरंडक ठेवण्यासाठी एक कप्पाही कोरला होता. त्याच्या वर लाकडी फळीचे झाकण ठेवण्याची खोबणसुद्धा कोरलेली पाहायला मिळते. काळाच्या ओघात वरचा बांधलेला अंडाकृती भाग पडून गेला. चैत्यगृहात खूप माती, चिखल, दगड जमा झाले, काही खांबही पडले, पण जेव्हा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने इथे साफसफाई केली तेव्हा या स्तूपाच्या आत ठेवलेल्या अस्थिकरंडकाचे काही भाग मिळाले. एकात एक मावतील असे तीन स्फटीकाचे करंडक झाकणासकट सापडले, पण ते उघडले गेले होते आणि त्यातल्या अस्थी सापडल्या नाहीत. अशा प्रकारचा पुरावा हा अत्यंत दुर्मिळ असून तो फक्त बांधीव स्तूपातच सापडला आहे.
पितळखोरा येथील चैत्यगृहात इ.स.पूर्व दुसऱया ते पहिल्या शतकात कोरलेले काही स्तंभलेखही आहेत. यामध्ये ‘पैठण येथील गन्धिक कुलातील मितदेव’ याचे दान असलेला एक स्तंभ आहे, तर ‘पैठण येथीलच संघक याच्या मुलाने दान दिलेला’ एक स्तंभ आहे. पैठण ही सातवाहन काळातील फार मोठी बाजारपेठ होती. त्याचे पुरावे जसे विविध प्रकारच्या साहित्यातून पाहायला मिळतात तसे अशा प्रकारच्या शिलालेखातूनसुद्धा दिसतात. पश्चिम किनाऱयावरील कल्याण, सोपारा येथील बंदरांमध्ये आलेला परदेशी प्रवाशांचा माल हळूहळू भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात पोहोचविण्यासाठी निरनिराळे व्यापारी मार्ग वापरले जात असत. असाच एक महत्त्वाचा मार्ग पितळखोऱयाच्या जवळून जात होता. त्यामुळे या स्थळाला खूप महत्त्व प्राप्त झाले. या व्यापारामध्ये केवळ स्थानिकच नाही तर परदेशी व्यापारीसुद्धा सहभागी होत असावेत. पुढे इ.स.च्या दुसऱया शतकातील टोलेमी नावाच्या ग्रीक प्रवाशाने त्याच्या ‘जिओग्राफी’ नावाच्या पुस्तकात ‘पेत्रीगाला’ नावाच्या एका स्थळाचा उल्लेख केला आहे. ते हेच असणार असे अभ्यासकांचे मत आहे.
या चैत्यगृहाच्या काही खांबांवर जसे कोरीव लेख आहेत, तशीच बऱयाच खांबांवर गौतम बुद्धाची चित्रेही काढली आहेत. तसेच भिंतीवर बोधिसत्व अवलोकितेश्वर याचेही चित्र काढलेले दिसते. अशा प्रकारची चित्रे साधारणपणे इ.स. 5व्या – 6व्या शतकात काढली जात असत. त्यामुळे अजिंठय़ातील अशा चित्रांना समकालीन किंवा थोडी नंतरही काढली गेली असावीत असा अभ्यासकांचा कयास आहे. या परिसरात पर्यटकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या चित्रांची परिस्थिती आजही पुष्कळ चांगली आहे. त्यांचे रंग अजूनही ताजे आहेत. येथील लेणीसमूहात गौतम बुद्धाची एकही मूर्ती जरी सापडली नसली तरी त्याचे मानवी रूपात अंकन करणारी चित्रे मात्र आजही पाहायला मिळतात.
भारतातील शैलगृहसमूह हे निसर्गरम्य स्थळी आढळतात. त्यातही काही ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य खूपच ठळकपणे जाणवते, पण निसर्गसौंदर्याबरोबरच शिल्प आणि स्थापत्य यांचेही सौष्ठव जिथे उल्लेखनीय असते अशा ठिकाणांमध्ये पितळखोरा या स्थळाचे नाव प्रथम घेतले पाहिजे. आज जरी येथील शैलगृहांची पडझड झाली असली तरी जेव्हा ही जागा भिक्षूंच्या वास्तव्याने आणि लोकांच्या जाण्यायेण्याने गजबजली जात असेल तेव्हा तिचे सौंदर्य कसे असेल याची कल्पना आपण आजही करू शकतो. त्यात भर म्हणजे तिथला धबधबा, या सर्वांमुळे तिथून हलूच नये असे वाटते. या ठिकाणी असलेल्या शिल्प आणि स्थापत्याची कहाणी इथेच संपत नाही. अजून बरेच काही आहे जे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)


























































