
> प्रा. समीर जाधव
marathidepartment1956gmail-com
नायकांची तंजावरमधील सत्ता लयास गेली आणि तंजावरच्या राजकारणात मराठय़ांचा प्रवेश होऊन शहाजी भोसले – तुकाबाई यांचे पुत्र व्यंकोजी हे तंजावरमध्ये मराठा राजवटीचे संस्थापक ठरले. तंजावर येथील बृहदेश्वराच्या शिलालेखात व्यंकोजींनी सन 1676 च्या एप्रिलमध्ये तंजावरात कायमचा मुक्काम केला असा उल्लेख आढळतो.
मदुराईच्या चोक्कानाथ नायकाशी असलेल्या पारंपरिक वैरामुळेच तंजावरच्या विजयराघवने आपल्या कन्येचा विवाह मदुराईच्या चोक्का राजपुत्राशी लाऊन देण्यास नकार दिला. हे एक कारण नायकांची तंजावरमधील सत्ता लयास जाण्यास कारणीभूत ठरले आणि तंजावरच्या राजकारणात मराठय़ांचा प्रवेश होऊन शहाजी भोसले – तुकाबाई यांचे पुत्र व्यंकोजी /एकोजी /वंकोजी हे तंजावरमध्ये मराठा राजवटीचे संस्थापक ठरले. तंजावर येथील बृहदेश्वराच्या शिलालेखात व्यंकोजींनी सन 1676 च्या एप्रिलमध्ये तंजावरात कायमचा मुक्काम केला असा उल्लेख आढळतो. व्यंकोजी हे फक्त योद्धाच नसून पिकपाण्याची उन्नती करण्यातही मोठा कर्तृत्वशाली राजा म्हणून प्रसिद्ध होता. तंजावर येथे स्थायिक झाल्यानंतर व्यंकोजींनी आपले संपूर्ण लक्ष शेती आणि आपल्या प्रजेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे केंद्रित केले. मदुरा मिशनच्या काही पत्रांमध्ये व्यंकोजी महाराजांना आपल्या संस्थानाविषयी किती तळमळ वाटत होती याचा स्पष्ट उल्लेख आहे.
नायकराजांच्या काळात संस्कृत व तेलुगू साहित्य आणि कला भरभराटीस येऊन समृद्ध झाल्या होत्या. त्यांच्या वृद्धीसाठी नायकांच्या मागून येणाऱया राजाला फक्त पूर्वपरंपरा कायम ठेवण्याचे काम राहिले होते. व्यंकोजींनीही आपल्या काळात कलांना आणि साहित्याला उत्तेजन दिले. स्वतः व्यंकोजीने तेलुगू भाषेमध्ये द्विपद रामायण ग्रंथित केल्याचाही उल्लेख आढळतो. व्यंकोजीच्या कारकीर्दीतील रोमांचकारी धामधुमीचा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकावर सन 1676-1677 मध्ये जी स्वारी केली तो होय. आपल्या तीर्थरूपाच्या जाहागिरीतील आपला भाग घेण्यासाठी ही स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती हे प्रसिद्धच आहे. मुख्य मुसलमानी सत्तेपासून विभक्त होऊन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न व्यंकोजी करीतच होता. त्यास मदत करून मराठी राज्याचा भगवा झेंडा कर्नाटकात फडकवावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी ही कर्नाटकावर स्वारी केली होती. महाराष्ट्रात परत येताना महाराजांनी जिंजी व कोलेरून या प्रांतावर आपल्यातर्फे संतोजी यास मुख्य सुभेदार नेमले. व्यंकोजीने संतोजीवर स्वारी केली, पण संतोजीने ती परतून लावली. या प्रसंगामुळे महाराज उद्विग्न झाले आणि त्यांनी व्यंकोजीला पत्र लिहले. त्या पत्रात ‘गृहकलह बरा नव्हे, आम्ही रीतीने वडीलपणे आजवरी तुम्हाला सांगितले, आताही सांगतो, ऐकाल तरी बरे. तुम्ही सुख पावाल न ऐकाल तरी तुम्हीच कष्टी व्हाल. आमचे काय चालते? बहुत काय लिहिणे.’ अशी समज दिली.
तंजावरसारख्या कला आणि संस्कृतीदृष्टय़ा समृद्ध असलेल्या संस्थानाचे शेजारी मात्र मोठे मत्सरी होते. त्यांनी तंजावरला सतवण्याची एकही संधी व्यर्थ घालवली नाही. व्यंकोजीने या संकटग्रस्त परिस्थितीला तोंड दिले. त्यांना तंजावरवर आक्रमण करणाऱया मदुराई आणि म्हैसूरसारख्या प्रतिकूल शक्तींविरुद्ध लढा द्यावा लागला. 1678 मधील युद्धात व्यंकोजीला माघार घ्यावी लागली. आपला पराजय झाल्यामुळे व्यंकोजीला खेद वाटून वैराग्य आले होते. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजीना दुसरे पत्र लिहून ‘पुरुषार्थ आणि कीर्ती अर्जण करणे. रिकामे बैसोन, लोकांहाती नाचीज खाववून, काल व्यर्थ न गमावाणे. कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेती. वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे. आज उद्योग करून आम्हांसी तमासे दाखविणे’ हा उपदेश केला. पुढे मुस्लिम सत्तेने चोक्कानाथाचीच गादी बळकावली यावेळी व्यंकोजीने पूर्वीचे वैर बाजूला सारून चोक्कानाथानाला मदत केली आणि म्हैसूरच्या आक्रमनापासून त्रिचीचा किल्ला वाचविला. व्यंकोजी राजाच्या या शौर्याचे आणि उदार बुद्धीचे वर्णन व्यंकोजीला समकालीन शिवराम कवी याने ‘कमलकलानिधी’ या तेलुगू काव्यात केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई आणि त्यांचा मुलगा राजेशाही राजाराम यांनी तंजावर (अय्यमपेट्टई) येथे थोडय़ा काळासाठी वास्तव्य केले. महाराणी सोयराबाई त्यांचे गमावलेले राज्य टिकवून ठेवण्यासाठी जवळच्या मंदिरात प्रार्थना आणि पूजा करत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते मराठा राज्यात परतले. महाराणी सोयराबाई आणि राजकुमार राजाराम यांच्या वास्तव्याचे स्मरण म्हणून व्यंकोजीने सोयराबाईंचा पुतळा तयार केला. ही मूर्ती गरुडलवारच्या शेजारी असलेल्या श्री रामस्वामी मंदिरात आहे. तंजावरशिवाय त्यांची मूर्ती भारतात इतरत्र कुठेही नाही. त्यांनी या जागेचे नाव रामचंद्रपुरमवरून राम सोयरापुरम असे बदलण्याचा आदेशही दिला.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)

























































