शत्रूंचे लांब पल्ल्याचे टार्गेट हिंदुस्थानच्या आवाक्यात! ‘अग्नी-3’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने ‘अग्नी-3’ मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशातील एकात्मिक चाचणी केंद्र (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज), चांदीपूर येथे करण्यात आली. रणनीतिक दल कमांड (स्ट्रटेजिक फोर्सेस कमांड – एसएफसी) च्या जवानांनी मोबाईल लाँचरद्वारे हे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण नियमित प्रशिक्षण सरावाचा एक भाग होते. अग्नी-3 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी करण्यात आल्याने आता शत्रूंचे लांब पल्ल्याचे टार्गेट हिंदुस्थानच्या आवाक्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या शत्रूला धडकी भरली आहे.

‘अग्नि-3’ क्षेपणास्त्राच्या चाचणीने सर्व उद्दिष्टय़े पूर्ण केली असून सर्व तांत्रिक, ऑपरेशनल पॅरामीटर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे, असे संरक्षण अधिकाऱयानी सांगितले आहे. चाचणी दरम्यान, ऑटो-लाँच कमांड दिल्यानंतर दोन टप्प्यांच्या घन इंधनावर चालणाऱया या क्षेपणास्त्राने नियोजित मार्गावर उड्डाण केले. त्यानंतर त्याने बंगालच्या उपसागरातील पूर्वनियोजित लक्ष्यावर अचूकतेने धडक दिली. पूर्व किनारपट्टीवरील रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणालीद्वारे क्षेपणास्त्राच्या मार्गाचे, विविध पॅरामीटर्सचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यात आले. प्रभाव बिंदूजवळील दोन डाऊन-रेंज जहाजांनी अंतिम टप्प्यातील घटनेची नोंद केली. अग्नी-3 हे 17 मीटर लांब क्षेपणास्त्र असून, त्याची मारक क्षमता 3,000 ते 3500 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. हे पारंपरिक तसेच अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले अत्यंत अचूक आणि प्रगत क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 2011 पासून सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या विश्वसनीय किमान प्रतिरोधक धोरणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या अग्नी-3 च्या यशस्वी चाचणीमुळे देशाची रणनीतिक संरक्षण क्षमता आणि ऑपरेशनल तयारी आणखी बळकट झाली आहे.

वेगवेगळ्या रेंजची मिसाईल

अग्नी-1 ची मारक क्षमता 700 किमी, अग्नी-2 ची 2 हजार किमी आणि अग्नी-3 ची 3 हजार किमी, अग्नी-4 ची 4 हजार किमी आणि अग्नी-5 ची मारक क्षमता ही 5 हजार किमीपर्यंत असणार आहे. 700 किमी मारक क्षमता असलेली अग्नी-1 मिसाईलचा वापर कमीत कमी 220 किलोमीटर दूरच्या टार्गेटला लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.