
शिळफाटा येथील खान कंपाऊंडमधील डबक्यात एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. कशफ खान असे या चिमुकलीचे नाव असून ती आशना हाईट्समध्ये राहते. तिचा मृतदेह सापडल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात की घातपात याचा तपास शीळ-डायघर पोलीस करत आहेत.
खान कंपाऊंडच्या मागे असलेल्या डबक्यात सकाळी कशफचा मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत माहिती मिळताच डायघर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व शीळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिचा मृतदेह डबक्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे. या शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नेमका काय प्रकार घडला याचा उलगडा होणार आहे.




























































