कारवाईसाठी आरटीओची चार विशेष भरारी पथके, पनवेलमधील बेशिस्त रिक्षाचालकांना ‘ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांची लूट व अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईसाठी आरटीओने चार विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पनवेल, खारघर आणि मानसरोवर परिसरातील गर्दीच्या स्थानकांवर ही पथके तैनात करण्यात येणार असून ते रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर करडी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना ‘ब्रेक’ लागणार आहे.

मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी आरटीओ कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. या रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी आरटीओने विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके गणवेश न घालता रिक्षा चालवणे, मीटरचा वापर न करता प्रवाशांकडून अव्वाचेसवा भाडे आकारणे, मीटरमध्ये छेडछाड करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य सामान्य नागरिकांसोबत दादागिरी करणे, भाडे नाकारणे, बेशिस्त रिक्षा पार्किंग, रिक्षा स्टॅण्ड व्यतिरिक्त बेकायदेशीरपणे रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांवर ही पथके तत्काळ कायदेशीर व दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून मुजोर रिक्षाचालकांना लगाम बसणार आहे.

परमिट रद्द होणार

प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांची गय केली जाणार नाही. आरटीओची सर्व पथके साध्या वेशात तैनात करण्यात येणार असून ती सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच दोषी आढळलेल्या मुजोर रिक्षाचालकांचे परमिट रद्द करण्यापर्यंतची तरतूद या कारवाईत करण्यात आल्याची माहिती पनवेलच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.