आंगणेवाडीत श्री भराडी देवी यात्रोत्सवाची उत्साहात सांगता, दोन दिवसांत सुमारे 8 लाख भाविकांचे दर्शन; महाप्रसाद व दर्शनासाठी प्रचंड गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ध्वनिक्षेपकावर सुरू असलेला देवीचा गजर, महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणाबाहेर उसळलेली भाविकांची गर्दी आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला असा नजारा सोमवारी रात्री आंगणेवाडीत पाहावयास मिळाला. नवसाला पावणाऱया श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची मंगळवारी सायंकाळी मोठय़ा उत्साहात सांगता झाली.

महाप्रसादाची ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री 9.50 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली होती. ही रांग पुन्हा रात्री 1.00 नंतर सुरू झाली. सकाळी तसेच सायंकाळी भाविकांची उच्चांकी गर्दी अनुभवायला मिळाली. मंगळवारीही आंगणेवाडी यात्रेचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

यात्रेच्या दोन दिवसांत सुमारे 8 लाख भाविकांनी आई भराडीचे दर्शन घेतले. मंगळवारी सायंकाळनंतरही दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ सुरूच होता. मंगळवारी आंगणे ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेऊन ओटय़ा भरल्या. नवस बोलणे, नवस फेडणे व ओटी भरणे हे विधी सायंकाळपर्यंत सुरू होते. भाविकांच्या सोयीसाठी एपूण नऊ दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.

महाप्रसाद ताटे लावण्याचा कार्यक्रम

यात्रोत्सवातील महत्त्वाचा महाप्रसाद ताटे लावण्याचा कार्यक्रम शनिवारी रात्री 9.50 वाजता सुरू झाला. प्रथम मानकऱयांची ताटे सवाष्ण महिलांकडून देवीच्या प्रांगणात आणण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या घरांतून आणलेली महाप्रसादाची ताटे लावण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

आंगणेवाडीत आज स्वच्छता अभियान

यात्रेनिमित्त निर्माण झालेला कचरा हटवण्यासाठी बुधवारी आंगणेवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. इच्छुक शाळांनी मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीनेही स्वतंत्र स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

दोन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल

सायंकाळनंतर भाविकांची गर्दी वाढत गेली. रात्री बारानंतर तर देवालयाबाहेरील परिसरात रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. यात्रेच्या दोन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. खेळण्यांच्या भागात लहान मुलांची गर्दी होती. मोडजत्रेत शेतीची अवजारे व गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठीही मोठी गर्दी झाली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बचतगटांच्या स्टॉलना चांगला प्रतिसाद मिळाला.