
बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-3) अंतर्गत अतिरिक्त इमारत बांधकामे व विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारणीसाठी 75.13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथील 80 हजार चौ.मी. क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार असून यामुळे पुणे जिह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंक, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान यासह विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

























































