
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी ‘इंडिगो’ने (IndiGo) सुधारित ‘फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स’ (FDTL) नियमांचे आज, ११ फेब्रुवारीपासून पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे कंपनीला देण्यात आलेली तात्पुरती सवलत आता संपुष्टात आली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या अपडेटनुसार, इंडिगोला देण्यात आलेली ही सवलत १० फेब्रुवारी २०२६ पर्यंतच लागू होती. आजपासून कंपनीला नागरी विमान वाहतूक नियमावलीतील (CAR) सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
सवलत का देण्यात आली होती?
डिसेंबर २०२५ च्या सुरुवातीला इंडिगोच्या विमान सेवांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. हजारो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि ऑपरेशन्स पुन्हा सुरळीत करण्यासाठी DGCA ने इंडिगोला नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता दिली होती. मात्र, ही सवलत देताना DGCA ने अनेक अटी घातल्या होत्या, ज्यामध्ये दर तासाचा अहवाल सादर करणे आणि विमानतळांवर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे समाविष्ट होते.
बदललेले नियम आणि इंडिगोची तयारी
इंडिगोने स्पष्ट केले आहे की, कंपनी आता ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. यासाठी कंपनीने वैमानिक आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासू नये म्हणून ‘बफर’ क्षमता ३ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे कामाचे वेळापत्रक (Rosters) आता नवीन नियमांनुसार तयार करण्यात आले आहे. विमानांच्या संख्येनुसार वैमानिकांचे प्रमाण (Pilot-to-aircraft ratio) सुधारण्यावर भर दिला आहे.
इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘आम्ही नियामक प्राधिकरणांना दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या प्रणालीमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थिर विमान सेवेसाठी आम्ही कर्मचारी आणि वैमानिकांची पुरेशी तयारी करून ठेवली आहे.’
indigo complies with revised fdtl norms from february 11 after dgca exemption ends
indigo airline starts full compliance with new flight duty time limitation (fdtl) rules from feb 11, 2026, ending the temporary dgca exemption.



























































