रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण – आरोपींना शहरात दहशत निर्माण करायची होती, पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारात सहभागी असलेल्या आरोपींना शहरात दहशत निर्माण करायची होती, असा दावा पोलिसांनी आज न्यायालयात केला. दरम्यान याप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींना विशेष कोर्टाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

रोहित शेट्टी याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे यांना अटक केली आहे. तर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकर हा या प्रकरणातील वॉन्टेड आरोपींपैकी एक आहे. रिमांडसाठी आरोपींना आज बुधवारी विशेष मकोका कोर्टात सादर करण्यात आले. त्यावेळी आणखी 15 दिवसांची कोठडी मागताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींचे संबंध शुभम लोणकरशी आहेत जो फरार आहे आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर जो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हेगार असून न्यायालयीन कोठडीत आहे. एका आरोपीकडून जप्त केलेल्या शस्त्रांपैकी एक प्रवीण लोणकरने पुरवले होते आणि या टोळीचा उद्देश मुंबईत दहशत निर्माण करणे होता, असे पोलिसांनी सांगितले. बचाव पक्षाचे वकील सचिन झाल्टे पाटील आणि अजिंक्य मिरगल यांनी नव्याने रिमांड अर्जाला विरोध केला आणि म्हटले की, कोणतेही नवीन कारण नाही आणि केवळ मकोका लागू केल्याने पोलिसांना कोठडीचा अधिकार मिळत नाही.