
साहेब, आमच्या गल्लीत आई आणि मुलाचा खून झालाय लवकर या, अशी माहिती निर्दयीपणे खून करणाऱया गुन्हेगारानेच फोन करून पोलिसांना दिली. तपासाची दिशा आपल्या दिशेने येणार नाही, यासाठी सुरुवातीपासून पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्न करणाऱया एका अल्पवयीन आरोपीसह तीनही आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी डबल मार्डरची ही स्टोरी आहे. 15 जुलै 2025 मधील ही घटना आहे. पंढरपूर शहरातील कुंभार गल्लीमध्ये राहणाऱया सुरेखा संजय जगताप (वय 45) आणि लखन संजय जगताप (वय 24) या मायलेकाचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. खून कोणी केला? का केला? यासह आरोपींबाबत कसलाही मागमूस नव्हता, कसलेही पुरावे नव्हते. घटना घडली तेव्हा कोणीही पाहिले नाही, ऐकले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
दरम्यान, खून झाल्याची घटना ज्यांनी कळविली होते. तेच या प्रकरणात पोलिसांना तपास कसा करावा, यासाठी सूचना देत होते. घटनेची खबरदेखील त्यांनीच दिली होती. पोलिसांना याबाबत थोडी शंका होती. मात्र, ठोस पुरावे नव्हते; परंतु पोलिसांनी सतत पाळत ठेवल्याने खुनातील तीन आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांच्या गळाला लागला आणि खुनाचा उलगडा झाला. सदरच्या खुनामागे वैयक्तिक हेवेदावे, अनैतिक संबंध आहेत का, या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांचा तपास संभ्रमित करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या युक्त्या लढवित पोलिसांना सात महिने भरकटविले. अखेर पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.
सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, सहायक पोलीस निरीक्षक हमीद शेख, शरद कदम, सूरज हेम्बाडे, विजय शिंदे, प्रकाश कारटकर, नारायण गोळेकर, मोहन मणसावले यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
































































