
>> विलास हरी कीर
महाराष्ट्रातील अनेक समाजोपयोगी कामांसाठी निःस्पृह वृत्तीने संपूर्ण आर्थिक भार उचलणारे, जाती-जातीतील भेदभाव दूर करून सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारे, स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, मुंबईसह महाराष्ट्रात देखण्या इमारती व वास्तू उभारणारे भागोजीशेठ कीर यांच्या येत्या महाशिवरात्रीला येणाऱया जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा वेध.
स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगे महाराज संत, पाचलेगावकर महाराज यांनी ज्यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करून ज्यांना पाठबळ दिले त्या दानशूर भागोजीशेठ कीर यांच्याविषयी आजच्या पिढीला फारशी माहिती नाही. ते दानशूर तर होतेच; परंतु स्वातंत्र्य लढ्यातील ‘चले जाव’ चळवळीला प्रेरणा देणारे, देशप्रेमी होते व स्पृश्यास्पृश्य भेद मिटवून सहभोजनांचे आयोजन करणारे दयाळू व्यक्तिमत्त्व होते.
गरिबीमुळे प्राथमिक शिक्षणही धड न झालेल्या भागोजींनी सुतारकामातील काwशल्याच्या जोरावर बांधकाम व्यवसायात कसा प्रवेश केला आणि कल्पक आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या दैवी देणगीमुळे अभियंते आणि आर्पिटेक्चरलाही लाजवील अशा मुंबईसह महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या देखण्या इमारती आणि वास्तू कशा उभारल्या हे समजले तर आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. त्यांचा हा जीवन प्रवास म्हणजे भक्तिमार्गातून समाजोद्धाराच्या प्रेरणेने केलेली वाटचाल होती. ना त्यांचे पुरेसे काwतुक झाले, ना महाराष्ट्राच्या इतिहासात नाव झाले. शिवाजी पार्क चौपाटीजवळची सात एकर जागा विकत घेऊन त्या जागी त्यांनी उभारलेली स्मशानभूमी एवढ्यापुरतेच त्यांचे नाव मर्यादित राहिले.
रत्नागिरी किनाऱयालगत असलेल्या पेट या छोटय़ाशा गावात अत्यंत गरीब कुटुंबात 4 मार्च 1869 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेले घरातील दारिद्र्य, कर्जापायी सतत सावकाराचा तगादा, लोकांकडून होणारा उपहास, निंदा, अपमान, अवहेलना यांना तोंड देताना आई-वडिलांची कशी बिकट स्थिती होते हे छोटा भागोजी पाहत होता. गरिबीमुळे चौथीपर्यंतचे शिक्षणही तो धड घेऊ शकला नाही. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केलेले सर्व प्रयत्न जेव्हा फोल ठरले तेव्हा हातात पुरेसे पैसे नसतानाही तांडेलाच्या ओळखीमुळे त्याने पोटापाण्यासाठी आगबोटीने मुंबई गाठली. योगायोगाने एका सुताराशी त्याची गाठ पडली आणि त्याच्यामार्फत मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक पालनजी मिस्त्री यांच्याकडे त्याला सुतारकाम मिळाले. अपार मेहनत, अंगभूत काwशल्य, प्रामाणिकपणा, सचोटी, अफाट कल्पनाशक्ती, बुद्धीची असामान्य चमक या गुणांमुळे पालनजी मिस्त्री यांना त्यांच्यातील वेगळेपण जाणवले. शापूरजी आणि पालनजी हे दोघे बांधकाम व्यवसायिक तेव्हा शापूरजी-पालनजी कंपनी चालवत होते. अठरा वर्षांचे झाल्यावर पालनजी यांनी भागोजींना त्याच्या कामातील कर्तबगारीमुळे सबकाॅन्ट्रक्टर म्हणून बढती दिलीच, त्याशिवाय आपल्या व्यवसायातील भागीदार म्हणून त्यांची नियुक्ती केली. बांधकामे आपल्या कल्पनाशक्तीतून अधिक आकर्षक कशी करता येतील याचा विचार भागोजी सतत करीत असत. त्यामुळे कंपनीची भरभराट झाली. त्यांनी बांधकाम क्षेत्रात मुंबईतच नव्हे, तर देशात केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे भागोजींचे भागोजीशेठ झाले. हातात भरपूर पैसा खेळू लागला. आपल्या बांधकाम व्यवसायाच्या मिळकतीतील 80 टक्के रक्कम त्यांनी समाजोपयोगी मोठमोठय़ा कामांसाठी खर्च केली. त्यावर स्वतःची मालकीही सांगितली नाही.
भागोजींनी आपल्या वास्तव्यात पाणपोया, विहिरी, गोशाळा बांधल्या. शालेय इमारती, धर्मशाळा, मंदिरे बांधली, अनाथ बालकाश्रम, महिला विद्यालये, अनाथाश्रमांची उभारणी केली. या सर्व ठिकाणी हिंदू संस्पृती टिकावी म्हणून भजन-कीर्तन, नामसप्ताह, खेळ, कसरती, पोवाडे, सहभोजन, पालखा मिरवणुका यांसारख्या स्नेह वृद्धिंगत करणाऱया कार्यक्रमांचे आयोजन केले. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर हे त्यातील ठळक उदाहरण. जाती व्यवस्था गाडण्यासाठी आणि स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद मिटवण्यासाठी सर्व जातीपातींच्या लोकांसाठी ते खुले करून सहभोजनाचा उपक्रम राबविणारे ते देशातील पहिले राष्ट्रीय मंदिर होते.
हिंदू धर्मातील व्यक्तींची मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांच्या वेळी मुंबईत फार मोठी आबाळ होत असे. त्यावेळी कित्येक साधूसंत, पुरोहित, किरवंत, समाजसेवक यांनी ही व्यथा भागोजीशेठ यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी संत पाचलेगावकर महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईत दादर चौपाटी येथे नऊ एकर जागा स्वतः विकत घेतली. तिथे हिंदूंसाठी स्मशानभूमी बांधून तेव्हाच्या इंग्रज सरकारला दानही केली. स्मशानभूमीच्या जागेत भागोजीशेठ कीर यांचा पुतळा फक्त 90 चौरस फूट जागेत बसविला आहे.
भागोजीशेठ कीर यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील ज्या इमारती आणि वास्तूंचे बांधकाम केले ते पाहून आजही थक्क व्हायला होते. त्यातील कलापुसर, नक्षीकाम आणि एकूण त्यांचा देखणा बाज पाहून त्यांच्या कर्तृत्वाची महानता कळते. मुंबईचे ब्रेबॉर्न स्टेडियम, अॅम्बेसेडर हॉटेल, मफतलाल सेंटर, इंडियन मर्चंट चेंबर, सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया इमारत, वाडिया इमारत, बॉम्बे सेंट्रल स्टेशन, माधवजी धरमजी मिल, नाशिक सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, ग्वाल्हेरच्या महाराजांचा बंगला यांसारख्या अनेक वास्तू आणि इमारती त्यांनी बांधल्या. मरीन ड्राइव्ह सागर किनारी भिंत बांधली. मरीन ड्राइव्हच्या सुभाषचंद्र बोस रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रकाशाने चमकणाऱया क्वीन्स नेकलेसच्या निर्मितीतही भागोजीशेठ यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन उद्योजक पालनजी यांनी त्यांना ‘मॅनेजमेंट गुरू’ ही पदवी दिली तर हिंदू धर्माच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेली कामगिरी पाहून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना ‘हिंदू धर्मरक्षक’ ही पदवी दिली. वैशिष्टय़ म्हणजे भागोजीशेठ यांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी झाला आणि त्यांचे देहावसानही 1944 साली महाशिवरात्रीच्याच दिवशी झाले.
अखिल भारतीय भंडारी समाज पुरस्कृत स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी त्यांचा जन्मोत्सव साजरा करून मानवंदना दिली जाते. येत्या महाशिवरात्रीला म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य शोभायात्रा – मिरवणूक सेंच्युरी बाजार, बेंगॉल केमिकल, वरळी येथून भागोजीशेठ कीर स्मृतिस्थळ, दादर चौपाटीपर्यंत काढण्यात येणार असून शेवटी अभिवादन सभा होणार आहे.






























































