लष्करी अधिकाऱ्यांच्या लेखणीवर मोदी सरकार लादणार निर्बंध, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचे हादरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच मोदी सरकारला हादरे बसले आहेत. सरकारने लष्करी अधिकाऱ्यांच्या लेखणीवर निर्बंध आणण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्या अनुषंगाने लष्कराशी संबंधित पुस्तके लिहिण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी संरक्षण मंत्रालय नवीन गाईडलाइन्स लागू करणार आहे.

पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांसाठी नवे नियम बंधनकारक असणार आहेत. सध्या सशस्त्र दलाच्या सेवेत असलेल्या तसेच निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना लष्कराशी संबंधित पुस्तके लिहिण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी नवीन गाईडलाइन्स लागू असेल. नवीन नियम तयार करण्यासाठी नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यात सविस्तर सादरीकरण करण्यात आले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नव्या गाईडलाइन्समध्ये विद्यमान सेवा नियम तसेच अधिकृत गुपिते कायद्याच्या तरतुदींचा समावेश असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे पुस्तक लेखन नियंत्रित करणारा कोणताही विशिष्ट कायदा नाही. त्यांना पुस्तकाचा प्रकार व त्यातील मजकुरावर अवलंबून वेगवेगळे कायदे व नियम लागू होतात. आता माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर मोदी सरकारने लष्करी अधिकाऱ्यांच्या लेखणीवर निर्बंध आणण्याचे पाऊल उचलले आहे.

  • जर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पुस्तकात लष्करी कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती किंवा गोपनीय माहिती असेल, तर ती प्रथम संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करावी लागते. मंत्रालय संबंधित विभागाकडे पडताळणी केल्यानंतर प्रकाशनासाठी परवानगी देते.
  • सेवेत असलेल्या लष्करी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियम आणखी कडक आहेत. त्यांना सर्वप्रथम कोणतेही पुस्तक वा लेखासाठी लेखी परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी कमांडद्वारे लष्कर मुख्यालय किंवा संरक्षण मंत्रालयापर्यंत पोहोचते.
  • वर्गीकृत माहिती, लष्करी कारवाया, शस्त्रास्त्र क्षमता, राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र संबंधांवर परिणाम करू शकणारा मजकूर असलेले कोणतेही पुस्तक प्रकाशित करण्यास सक्त मनाई आहे.