
नवी मुंबई महापालिकेत गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीतील कामांची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिला. वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात ते बोलत होते. नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील वाद आणखी चिघळण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेची पहिला महासभा येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याकरिता पाच ठराव या महासभेच्या कार्यक्रम पत्रिका जाहीर झाल्यानंतर नवी पटलावर ठेवण्यात आले आहेत. महासभेची मुंबईच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विविध विभागात गेल्या सहा वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पाच समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यावर बोलताना गणेश नाईक यांनी आज पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासकीय कालखंडात अनेक नियमबाह्य कामे झाले आहेत. या सर्वच कामांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे आढळून आले, त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यास आपण स्वतः सांगणार आहे, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
महासभा वादळी ठरणार
नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चौदा गावांतील नगरसेवक प्रसाद भोईर यांनी मंदा म्हात्रे यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मिळालेला भूखंड रद्द करण्यासाठी महासभेत ठराव आणला आहे. या ठरावाला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी विरोध केला असून हा ठराव विखंडित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान, २० फेब्रुवारीला होणारी ही महासभा बेकायदा आहे, असा आरोप शिंदे गटाच्या नगरसेविका पूनम पाटील यांनी करून महासभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पहिली महासभा वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





























































