
गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील दोन तरुणांसाठी ‘डंकी रूट’द्वारे बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा निर्णय जीवघेणा ठरला आहे. झकरिया गावातील ध्रुव पटेल आणि कंथारिया गावातील दीपिका पटेल या दोघांना अझरबैजानची राजधानी बाकू येथे अपहरणकर्त्यांनी ओलीस ठेवले होते. या तरुणांना केवळ बेदम मारहाणच करण्यात आली नाही तर, खंडणी न दिल्यास त्यांच्या किडनी काढून विकण्याची धमकीही देण्यात आली होती. सुदैवाने, हिंदुस्थान सरकारच्या तत्परतेमुळे आणि ‘ऑपरेशन महिसागर’ अंतर्गत राबवलेल्या बचाव मोहिमेमुळे या दोघांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
या घटनेची सुरुवात 30 जानेवारी रोजी झाली, जेव्हा हे दोघेही मुंबईतील काही एजंटच्या मदतीने अमेरिकेच्या प्रवासासाठी निघाले. 1 फेब्रुवारी रोजी ते बाकू येथे पोहोचले. मात्र, तिथे उतरताच त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांना एका निर्जन घरात डांबून ठेवले होते. धक्कादायक बाब म्हणजे, अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून ध्रुवला त्यांच्यासमोरच मारहाण केली. सुरुवातीला कुटुंबीयांनी सुमारे 6.5 लाख रुपये रोख आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दिले. मात्र अपहरणकर्त्यांची हाव संपली नाही आणि त्यांनी अधिक पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या संकटात सापडलेल्या कुटुंबांनी आणंदचे खासदार मितेश पटेल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने अझरबैजानमधील हिंदुस्थानच्या दूतावासाशी संपर्क साधला. राजनैतिक पातळीवर वेगाने सूत्रे हलवून अवघ्या 24 तासांत या दोन्ही तरुणांना अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवून दूतावासात सुरक्षितपणे आणले गेले. सध्या ध्रुव आणि दीपिका हिंदूस्थानाच्या दूतावासात असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना मायदेशी आणले जाणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या रॅकेटमागे बाबा खान नावाचा इराणी नागरिक आणि त्याचा सहकारी पवन रॉकी यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या टोळीने यापूर्वीही अनेक तरुणांना परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आणंद पोलीस मुंबईतील पाच संशयित एजंट्सचा शोध घेत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ‘डंकी रूट’चा हा थरार पुन्हा एकदा बेकायदेशीर स्थलांतरातील धोके अधोरेखित करणारा ठरला आहे.

























































