प्रफुल्ल पटेलांच्या तोंडी अमित शहांची भाषा, विलीनीकरण होऊ नये ही शहांची इच्छा! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस, शिवसेना यांचा काय संबंध? फार तर भाजपचा संबंध असू शकतो. कारण भाजप या सगळ्या राजकारणाची सूत्र हलवतेय. अदृश्य शक्ती, हात हे भाजप कडूनच येत असतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार की नाही, विलीनीकरणानंतर कोण अध्यक्ष होणार हे त्यांचे प्रश्न आहेत. त्यावर आम्ही का बोलावे, सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील बोलतील. अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोलतील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला दहा तोंड फुटलेली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो तंबू कोसळला आहे. त्याच्यामुळे त्या तंबूतील ऊंट, घोडे, बैल, गाढवं या सगळ्यांची धावाधाव चालू आहे. कोण काय बोलतंय याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असेही राऊत म्हणाले. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी अनौपचारिक गप्पांवेळी केलेल्या विधानावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, अनौपचारिक गप्पांना अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावर देश, राजकारण चालत नाही. ते काय बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ज्या अर्थी प्रफुल्ल पटेल बोलताहेत त्या अर्थी अमित शहांची इच्छा आहे की विलीनीकरण होऊ नये. भाजप हा अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे.

अजित पवार ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांचा सवाल

जे काही होणार ते अमित शहांच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलताहेत. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अमित शहांकडे आहेत, असेही राऊत म्हणाले.

भविष्यामध्ये या पक्षाचे काय होईल, हा पक्ष भाजपमध्ये मर्ज होईल का, असे विचारले असता राऊत म्हणाले की, विलीनीकरण झाले तर भाजपबरोबर होईल. शिंदे आणि अजितदादांचे लोक भाजपमध्ये जातील. जसे ‘युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका’ आहे तसे ‘युनायटेड स्टेट नेशन ऑफ भाजपा’ होईल, असे राऊत म्हणाले.

नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, मंत्रालयातील ACB च्या कारवाईवरून संजय राऊत यांची मागणी