
छत्रपती संभाजीनगर शहरातील भाजप आमदार संजय केणकर यांच्या कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्तूल सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक मानली जात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल आमदार संजय केणकर यांची भेट घेण्यासाठी एक तरुण कार्यालयात आला होता. मात्र काही कारणाने त्याची आमदारांशी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर कार्यालयात एक बॅग पडून असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. सदर बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये पिस्तूल आढळून आले. ही बाब समोर येताच कार्यालयात एकच खळबळ उडाली. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या घटनेमागील नेमके कारण काय, बॅग कोणाची होती आणि पिस्तूल कार्यालयात कसे आणले गेले, याचा सध्या पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. आमदारांच्या कार्यालयात अशा प्रकारे पिस्तूल आढळल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.




























































