
मुलुंड पश्चिम येथील एलबीएस मार्गावर काँक्रीट स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि तिघे जखमी झाल्याच्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कंत्राटदारावर 5 कोटी रुपयांचा आणि जनरल कन्सल्टंट्सवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त (एमएमआरडीए) अश्विन अशोक मुदगल यांनी शनिवारी दुर्घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मुदगल म्हणाले, “कोणालाही सोडले जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने केली जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, सर्व तक्रारींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
एमएमआरडीएकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































