
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे वादग्रस्त विधान कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केले.
मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा पह्टो लावल्याने वाद निर्माण झाला होता. वाद चिघळल्यावर त्यांनी तो पह्टो दालनातून काढून टाकला. यामुळे वाद शमेल अशी अपेक्षा असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांशी टिपू सुलतान याची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सकपाळ यांच्या वक्तव्यावरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून सपकाळांनी आपले विधान मागे घ्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सपकाळ नेमके काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्या प्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्याचा विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपुत्र होते, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे वक्तव्य कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
हे अतिशय निंदनीय -फडणवीस
टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. हे अतिशय निंदनीय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारून मोगलांच्या जोखडातून सामान्यांना मुक्त करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य निमाण केले. त्याचवेळी हजारो-लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानशी महाराजांची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन या जन्मात मी बघितले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.






























































