
रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत कर्नाटकचा स्टार सलामीवीर के. एल. राहुलने सलग दुसरे शतक झळकावून आपल्या संघाला 2 बाद 355 अशा मजबूत स्थितीत पोहचवले. उत्तराखंडविरुद्धच्या या सामन्यात राहुलने शतकी खेळी करत गोलंदाजांना घाम फोडला. राहुलपाठोपाठ देवदत्त पडिक्कलनेही 148 धावांची नाबाद खेळी करत पहिल्या दिवसावर कर्नाटकचे वर्चस्व राखले. दिवसअखेर पडिक्कलसह करुण नायर 37 धावांवर खेळत होता.
लखनौच्या इकाना स्टेडियमवर होत असलेल्या या लढतीत कर्नाटककडून कर्णधार मयंक अग्रवाल आणि राहुल यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, नवव्या षटकात आदित्य रावतने अगरवालला (32 चेंडूंत 32 धावा) बाहेरचा रस्ता दाखवत कर्नाटकला पहिला झटका दिला. त्यानंतर राहुलने देवदत्त पडिक्कलसोबत संयमी खेळी करत डाव सावरला. डावाच्या 28 व्या षटकात राहुलने 86 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दुसऱया सत्रातही चमक दाखवत त्याने 52 व्या षटकात आपल्या शतकाला गवसणी घातली.



























































