Delhi Bomb Blast – लाल किल्ला स्फोटामागे ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचे मोठे षडयंत्र; ‘अंसार अंतरिम’चा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा स्फोट म्हणजे एका मोठ्या देशव्यापी षडयंत्राचा भाग असून, त्यामागे ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला असून सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

या तपासातून समोर आले आहे की, सुशिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन जम्मू-काश्मीरसह देशातील प्रमुख शहरांमध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी ‘अंसार अंतरिम’ नावाचे एक नवीन दहशतवादी संघटना उभी केली होती. या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार पुलवामा येथील डॉ. उमर-उन-नबी हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. उमरनेच 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये 10 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. उमर हा 2016 पासून कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित झाला होता आणि त्याने यापूर्वी दोनदा दहशतवादी गटात सामील होण्याचा प्रयत्न केला होता.

एप्रिल 2022 मध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत या कटाची बीजे रोवली गेली होती. या बैठकीत मुझम्मिल गनी, उमर-उन-नबी, आदिल राथेर आणि मौलवी इरफान यांसारख्या संशयितांनी ‘अंसार अंतरिम’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आदिलची ‘अमीर’ म्हणजेच प्रमुख म्हणून, तर इरफानची उपप्रमुख आणि मुझम्मिल गनीची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तपासात असेही आढळले की, जुन्या दहशतवादी संघटनांशी संपर्क तुटल्यामुळे या शिक्षित तरुणांनी स्वतःचे नवीन मॉड्यूल तयार केले होते. अल-कायदाशी संबंधित असलेल्या ‘अंसार’ या शब्दाचा वापर करून त्यांनी आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. निधी गोळा करणे आणि स्फोटके जमवण्याची जबाबदारी प्रामुख्याने उमर आणि गनी यांच्यावर होती. सध्या या मॉड्यूलच्या इतर सदस्यांचा शोध सुरू असून, या शोधमोहिमेमुळे देशातील इतर शहरांवरील मोठा धोका टळल्याचे मानले जात आहे.