
जगभरात आयटी क्षेत्रात कोट्यवधी लोक काम करतात. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रावर संकट कोसळणार असल्याची चर्चा उद्योगविश्वात सुरू आहे. याबाबत आता हिंदुस्थानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक आणि सन मायक्रोसिस्टम्सचे संस्थापक विनोद खोसला यांनी खळबळ उडवणारे भाकीत वर्तवले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पुढील पाच वर्षांत माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ सेवा पूर्णपणे कालबाह्य होतील, असे ते म्हणाले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स केवळ साधी कामेच नाही, तर पुढील 15 वर्षांत डॉक्टर्स, वकील, अकाउंटंट आणि आर्किटेक्ट्स यांसारख्या उच्च कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची जागा घेईल. पुढील पाच वर्षांत बहुतांश आर्थिक कामांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवापेक्षा सरस ठरेल, असे विनोद खोसला म्हणाले. तसेच, शारीरिक कष्टाच्या कामांसाठी रोबोटिक्सचा वापर वाढेल, ज्यामुळे श्रमाची किंमत अवघ्या 2-3 डॉलर्सवर येईल, असेही ते म्हणाले.
हिंदुस्थानने आता नोकरी निर्मितीच्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. हिंदुस्थानने आयटी सेवांऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित उत्पादने आणि सेवांचा निर्यातदार बनण्यावर लक्ष केंद्रित करावे. हिंदुस्थानसाठी स्वतःचे ‘सॉव्हरिन एआय मॉडेल’ असणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी अनिवार्य आहे.
शिक्षण आणि आरोग्य सेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे स्वस्त होतील, ज्याचा फायदा सामान्यांना मिळेल, असेही विनोद खोसला यावेळी म्हणाले. चीनने ज्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जागतिक वर्चस्व मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे, त्याचप्रमाणे हिंदुस्थाननेही या शर्यतीत आघाडी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
एआयमुळे जगात पाणीटंचाईचा धोका, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक मोठी क्रांती आहे. जरी यामुळे नोकऱ्या कमी होणार असल्या, तरी सरकारांनी तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन नागरिकांना उच्च राहणीमान उपलब्ध करून देण्यासाठी संपत्तीचे पुनर्वितरण करणे आवश्यक ठरेल, असेही विनोद खोसला म्हणाले.
एआयमुळे 2025 मध्ये 1.20 लाख नोकऱ्या संपुष्टात, टेक इंडस्ट्रीत उलथापालथ!
























































