बंगळुरूमध्ये बँक मॅनेजरचा 3.5 कोटींच्या सोन्यावर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुगाराचा नाद लय वाईट असे का म्हणतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा बंगळुरूमध्ये आला आहे. बंगळुरूमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या उप व्यवस्थापकाने म्हणजेच बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने बँकेतील तब्बल 3.5 कोटी रुपये किंमतीच्या सोन्यावर डल्ला मारला आहे. किरण कुमार असे या आरोपीचे नाव आहे. बँकेत मोठय़ा विश्वासाने ग्राहकांनी ठेवलेले सोने या मॅनेजरने परस्पर दुसरीकडे गहाण ठेवून मिळालेले पैसे ऑनलाईन जुगारात उडवले आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्या ग्राहकांनी बँकेत सोने ठेवले होते त्यांचे धाबे दणाणले आहे.

बंगळुरूच्या गिरीनगर पोलीस ठाण्यात बँकेच्या मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या किरण कुमार याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी किरण कुमारने बँकेच्या लॉकरमध्ये असलेले ग्राहकांचे 2.7 किलो सोन्याचे दागिने बँकेतील वरिष्ठांना कोणतीही सूचना न देता चोरून ते एका फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले. या सोन्यावर थेट साडेतीन कोटी रुपये कर्ज घेतले. हे पैसे आरोपीने ऑनलाइन सट्टा आणि जुगार यासाठी वापरले. बँक कर्मचाऱयाने तपासणी केली असता 21 पॅकेटमधील दागिने गायब झाले होते. बँकेच्या मुख्य मॅनेजरने तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संबंधित कर्मचाऱयाविरोधात गुन्हा दाखल केला.

लॉकरमधील दागिन्यांची खात्री करा

आरोपीने ज्या फायनान्स कंपन्यांकडे हे सोने गहाण ठेवले आहे त्यांच्याकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत, तसेच संबंधित अर्थ कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाकडे मागणी करणार आहोत, असे पोलीस आयुक्ताने सांगितले. ज्या ग्राहकांनी बँक लॉकरमध्ये दागिने ठेवले आहेत त्यांनी वेळोवेळी दागिन्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, असा सल्लाही दिला आहे.