
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात सोमवारी दुपारी मद्यपी तरुणाच्या कारनाम्यामुळे सर्वांचीच धावाधाव उडाली. हा तरुण प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून थेट रुळावर झोपला. तितक्यात त्याच प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची एण्ट्री झाली. तथापि सजग प्रवासी आणि मोटरमनच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
सीएसएमटी स्थानकात सकाळी आणि सायंकाळच्या पीक अवर्सव्यतिरिक्तही प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांपुढेही आव्हान असते. याच परिस्थितीचा फायदा घेत सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असलेला तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून थेट रुळावर गेला आणि तेथे चक्क झोपला. मद्यपी तरुणाच्या या कारनाम्यामुळे इतरांची त्रेधातिरपीट झाली. त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी धावाधाव केली. काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील जीआरपी आणि आरपीएफच्या जवानांना पाचारण केले, तर काही प्रवाशांनी त्याच प्लॅटफॉर्मवर एण्ट्री करीत असलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनला इशारा केला. समोरील रुळावर एक प्रवाशी चक्क झोपल्याचे पाहून मोटरमनलाही धक्का बसला. त्या तरुणाला वाचवण्यासाठी मोटरमनने ब्रेक दाबला. सर्वांच्या प्रसंगावधानामुळे रुळावर झोपलेल्या मद्यपी तरुणाचे प्राण वाचले. रेल्वे पोलिसांनी मद्यपी तरुणाला ताब्यात घेतले.
तरुणावर गुन्हा दाखल
रुळावर झोपलेला तरुण दारूच्या नशेत होता. तो रुळावर का उतरला होता, याचा अधिक तपास केला जात आहे. त्याने वाहतुकीत अडथळा आणल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध रेल्वे कायदा कलम 145 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या कृत्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण होण्याबरोबरच इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानक परिसरातील मद्यपींवर विशेष वॉच ठेवणार आहेत.



























































