विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; सुनेत्रा पवारच होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. त्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बैठक 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यात यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अध्यक्षपदही त्यांनीच स्वीकारावे अशी कार्यकर्त्यांची भावना होती. आज सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरवले गेले.

राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्वांनी अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने मत दिल्याचे सांगण्यात येते.

विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

अजित दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. शरद पवार गटाकडून शनिवारी या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यापाठोपाठ अजित पवार गटाकडूनही या चर्चेला आता पूर्णविराम देण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.