
टिटवाळा शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून आता तर भूमाफियांनी चक्क रेल्वेच्या जागेत बेकायदा बांधकाम केले आहे. बांधकामधारकांना रेल्वे प्रशासनाने अनेकदा नोटिसा देऊनही बांधकामे हटवण्यात आली नाहीत. अखेर रेल्वे प्रशासनाने बुलडोझर चालवून १९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
टिटवाळा रेल्वे स्थानक अपलाइनजवळील रेल्वे मालकीच्या जागेवर दुकाने आणि निवासी बांधकामे उभारण्यात आली होती. या बांधकामधारकांना रेल्वे प्रशासनाने लेखी नोटीस देऊन ठरावीक मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अतिक्रमण न हटवल्याने रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. कारवाईदरम्यान कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून टिटवाळा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रेल्वे हद्दीतील अनधिकृत टफ्यांवर तोडक कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. रेल्वे हद्दीतील या कारवाईदरम्यान रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीदेखील उपस्थित होते अशी माहिती कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.
अनधिकृत चाळींचे काय?
टिटवाळ्यातील रेल्वे स्थानकाच्या आवारात व परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळीदेखील उभारण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथील घरांमध्ये शेकडो कुटुंबे राहतात. महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे झाली असून ती केव्हा तोडणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.

























































