
सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षेचे कारण देत युरोपियन संसदेने आपल्या खासदार आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या कामाच्या उपकरणांमधील (Work Devices) इन-बिल्ट एआय (AI) फीचर्सवर बंदी घातली आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या एका अंतर्गत ईमेलद्वारे हा निर्णय कळवण्यात आला असून ‘पॉलिटिको’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संसदेच्या तांत्रिक सहाय्य कक्षाने (e-MEP) असा इशारा दिला आहे की, काही एआय टूल्स उपकरणातील डेटा गुपचूकपणे क्लाउड सर्व्हरवर पाठवत आहेत. जी कामे डिव्हाइस स्वतः करू शकते, त्यासाठीही हा डेटा बाहेर पाठवला जात असल्याने गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत या सेवा पुरवठादारांकडून डेटा शेअरिंगबाबत पूर्ण स्पष्टता येत नाही, तोपर्यंत ही फीचर्स बंद ठेवणेच सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्या फीचर्सवर आली गदा?
मिळालेल्या माहितीनुसार, टॅब्लेट आणि फोनवरील रायटिंग असिस्टंट (Writing assistants), मजकुराचा सारांश देणारी टूल्स (Summarizing tools), प्रगत व्हर्च्युअल असिस्टंट आणि वेबपेज समरी फीचर्स आता वापरता येणार नाहीत. तथापि, ईमेल, कॅलेंडर आणि इतर नेहमीचे ॲप्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
खासगी फोनबाबतही सतर्कतेचे आदेश
संसदेने केवळ अधिकृत उपकरणांवरच नव्हे, तर खासदारांनी त्यांच्या वैयक्तिक फोन आणि टॅब्लेटवरही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘कामाचे ईमेल किंवा अंतर्गत कागदपत्रे स्कॅन करणाऱ्या कोणत्याही एआय फिचरला फीड करू नका’, असा स्पष्ट सल्ला ईमेलमध्ये देण्यात आला आहे. तसेच तृतीय पक्ष (Third-party) एआय ॲप्सना आपल्या डेटाचा पूर्ण ॲक्सेस न देण्याचेही सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही घालण्यात आली होती बंदी
युरोपियन संसदेने अशा प्रकारे तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये कर्मचारी उपकरणांवर ‘टिकटॉक’ (TikTok) बंदी घालण्यात आली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये काही खासदारांनी मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरऐवजी युरोपियन पर्यायाचा वापर करण्याचाही आग्रह धरला होता. विशेष म्हणजे, युरोपमधील ३२.७ टक्के नागरिक एआय टूल्सचा वापर करत असतानाच संसदेने हा कठोर निर्णय घेतला आहे.
european-parliament bans built-in ai features over data privacy concerns
the european parliament has disabled built-in ai features on official devices due to cybersecurity risks and concerns over data being shared with cloud servers.



























































