रायगडसाठी ५७६ कोटींचा आराखडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण विभागाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता तब्बल ५७६ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत विविध विभागनिहाय तरतुदींचे सादरीकरण करण्यात आले. प्रस्तावित निधीपैकी गाभा क्षेत्रासाठी २३८ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या गाभा क्षेत्रामध्ये कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास, पाटबंधारे, पूर नियंत्रण तसेच ऊर्जा या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.

बिगर गाभा क्षेत्रासाठी ११९ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये उद्योग व खाण, रस्ते विकास, सामान्य सेवा आणि सामान्य आर्थिक सेवा आदी विभागांचा यात समावेश आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी १८ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यासाठी २०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणीही करण्यात आली आहे.

रस्ता, शिक्षण, ऊर्जा
अतिरिक्त मागणीत नगरविकासासाठी ८० कोटी, रस्ते विकासासाठी ३५ कोटी, आरोग्य विभागासाठी २० कोटी, सामान्य शिक्षणासाठी १० कोटी, ऊर्जा विभागासाठी १० कोटी, ग्रामीण विकासासाठी १५ कोटी तसेच अभयारण्य सोयी-सुविधांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. बैठकीस कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल तसेच जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.