
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये उभारण्यात येणाऱ्या फेडेक्स हबचे भूमिपूजन बुधवारी १८ फेब्रुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी विमानतळ सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. या एजन्सीने सुमारे दोन महिने काम केल्यानंतर २५ डिसेंबर २०२५ पासून विमानतळावर प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात आली. विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होऊन दोन महिने होत आल्यानंतर आता कार्गो सेवा वेगवान करण्याच्या हालचाली विमानतळ व्यवस्थापनाने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या बुधवारी सकाळी ११ वाजता कार्गो टर्मिनलमध्ये फेडेक्स हबचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई विमानतळ सध्या पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे. आणखी एक धावपट्टी आणि तीन प्रवासी टर्मिनलचे काम अद्याप बाकी आहे.
पहिल्या टप्प्यात वर्षभरात सुमारे दोन कोटी प्रवासी विमानतळावर हाताळले जाणार आहेत. याच कालावधीत सुमारे ०.५ दशलक्ष टन मालाची वाहतूकही या विमानतळावरून होणार आहे.
विमानतळाचे सर्वच चारही टप्प्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर नऊ कोटी प्रवासी वर्षाला हाताळले जाणार आहेत.

























































