रेल्वेतील जेवणात झुरळ, किडे; प्रवाशांकडून पैसेही जास्त घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात रेल्वेमध्ये प्रवाशांकडून तिकिटासाठी मोठी रक्कम वसूल करूनही प्रवाशांना ट्रेनमध्ये हवी तशी स्वच्छता मिळत नाही, अशा तक्रारी अनेक प्रवाशांकडून आल्या आहेत. रेल्वेत मिळणाऱ्या जेवणावर सुद्धा हजारो प्रवासी असमाधानी आहे. रेल्वेतील जेवणावर दररोज सरासरी 35 प्रवासी रेल्वेकडे तक्रारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या जेवणात सर्रास झुरळ, छोटे छोटे किडे मिळणे किंवा जेवण बेचव असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अवघ्या एका वर्षात 13 हजार प्रवाशांनी रेल्वेकडे तक्रारी करून आपला संताप व्यक्त केला आहे.

रेल्वेतील जेवणात अजिबात गुणवत्ता नाही, तसेच या जेवणासाठी जास्त पैशांची वसुली केली जाते, अशाही तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते की, तक्रारी आल्या असल्या तरी यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. परंतु, एका रिपोर्टनुसार, एका रेल्वे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रेल्वेकडे जेवणासंबंधीच्या 13 हजार तक्रारी आल्या आहेत. मेल, सुपरफास्ट एक्सप्रेससह वंदे भारत ट्रेनमध्येही खराब जेवण मिळाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. आग्रा-बनारस वंदे भारत ट्रेनमध्ये सर्वात वाईट जेवण मिळाल्याची तक्रार केली आहे.

तक्रारींचा पाऊस

रेल्वेने प्रवास करताना वाईट जेवणाबद्दल हजारो प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. प्रवाशांनी तक्रारीमध्ये म्हटले की, जेवण मागवल्यानंतर जी चपाती मिळाली होती ती पापडासारखी कडक होती. पनीर आणि डाळ जी दिली ती शिळी म्हणजेच कालची होती. भोपाळ वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जे जेवण मागवले होते त्यात झुरळ होते, असे एका अन्य प्रवाशाने म्हटले आहे. प्रवाशांच्या तक्रारीसाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.