
कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत बस जळून खाक झाली आहे. बसचालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बसला नेमकी आग कशी लागली याबाबत स्थानिक पोलीस, बेस्ट आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाची सीएनजी इंधनावर चालणारी 289 क्रमांकाची बस कांदिवली स्टेशन ते अनिता नगर यादरम्यान धावते. मंगळवारी रात्री सवानऊच्या सुमाराला साईधाम मंदिर येथे बसने पेट घेतला. या घटनेमुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.























































