
पुण्यातील मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या खारगे समितीने मंगळवारीच त्यांचा अहवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र अद्याप बावनकुळे यांनी हा अहवाल वाचला नसल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अहवालाचा लिफाफा अद्याप पाकिटबंदच असल्याचे त्यांनी सांगितल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील महार वतनाची 1 हजार 800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे उघडकीस आले. या जमिनीवर आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे दाखवून कंपनीने 21 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफीसुद्धा पदरात पाडून घेतली.
























































