
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर पाकिस्तान हॉकी संघाचा कर्णधार शकील अहमद बट याने नॅशनल फेडरेशनच्या कारभारावर जोरदार टीका करत मोठे दावे केले आहेत. बुधवारी लाहोर विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर (PHF) गंभीर आरोप केले. या दौऱ्यादरम्यान खेळाडूंना राहण्यासाठी जागा न मिळाल्याने रस्त्यावर भटकावे लागले, इतकेच नाही तर सामन्याला जाण्यापूर्वी खेळाडूंना स्वयंपाकघरात भांडी घासावी लागली, असे सांगत त्याने आपला संताप व्यक्त केला.
शकील बटच्या मते, फेडरेशनने खेळाडूंशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली. सिडनी विमानतळावर संघाला 13 ते 14 तास ताटकळत बसावे लागले. जेव्हा संघ एफआयएच प्रो लीगसाठी हॉटेलवर पोहोचला, तेव्हा तेथे कोणतेही बुकिंग झाले नसल्याचे समोर आले. कारण व्यवस्थापनाला आगाऊ पैसे देण्यात आले नव्हते. यामुळे खेळाडूंना तासनतास रस्त्यावर राहावे लागले. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही झाला. कारण या मानसिक आणि शारीरिक त्रासानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
फेडरेशनच्या नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवताना बट म्हणाला की, एअरबीएनबीवर केवळ 10 दिवसांची व्यवस्था केली होती, तर संघाला 13 दिवस राहायचे होते. शेवटच्या दिवसांत खेळाडूंना अत्यंत स्वस्त आणि गैरसोयीच्या घरात राहावे लागले. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या खेळाडूंनी आता सध्याच्या मॅनेजमेंटसोबत काम करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणावर बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकीही फेडरेशनने खेळाडूंना दिली होती. मात्र ऑस्ट्रेलियात आलेला अनुभव अत्यंत भयानक असल्याने मी मौन सोडले आहे, असे बट याने स्पष्ट केले.
‘हमें बर्तन तक धोना पड़ा’
पाकिस्तान के हॉकी खिलाड़ियों ने बदइंतजामी के हुए शिकार। कैप्टन इमाद बट ने कहा, ” ऑस्ट्रेलिया टूर के दौरान हमें 13 घंटे तक अकेला छोड़ दिया गया। हमें अपने बर्तन भी खुद धोने पड़े।”#Pakistan #PakistanTeam #IndiaVSPakistanLIVE pic.twitter.com/2VYQ0L3JTF
— Chandan Singh Rajput (@imchandansinghs) February 18, 2026
दुसरीकडे, पाकिस्तान क्रीडा मंडळाने (PSB) या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्यांनी हॉटेल निवासासाठी 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली होती. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पीएसबीचे महासंचालक नूर उस सबा यावर सविस्तर अहवाल तयार करत आहेत. पाकिस्तान हॉकीला उभारी द्यायची असेल तर परदेशी प्रशिक्षक आणि पारदर्शक व्यवस्थापनाची गरज असल्याचेही शकील बट याने यावेळी स्पष्ट केले.
























































