Gold Silver Rate – ये कहाँ आ गये हम…! सोन्या-चांदीतील चढउतारामुळे गुंतवणुदार संभ्रमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जानेवारी महिन्यात सर्वोच्च उच्चांक गाठलेले सोने-चांदी सध्या दबावाखाली आहेत. असे असले तरी या दोन्ही धांतूमधील चढउतार तीव्र आहेत. या चढउतारामुळे गेल्या तीन ते चार महिन्यात बक्कळ कमाई केलेले गुंतवणुकदार आता जेरीस आले आहेत. या अस्थिरतेमुळे गुंतवणुकदार गुंतवणूक करत नसल्याने या धातूंवरील दबाव आणखी वाढत आहे. मात्र, मोठ्या संस्था आणि अनेक देशातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने दर झपाट्याने वाढत आहे. त्यानंतर लगेच घसरणही तीव्र होत आहे. आगामी काही दिवस सोने-चांदीत अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मंगळवार रात्री झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत बुधवारी मोठी वाढ दिसून येत आहे. मंगळवारी, एमसीएक्सवर चांदी ५.५८ टक्के घसरली, तर सोने २.४५ टक्के घसरले. तथापि, बुधवारी सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १.३० टक्के म्हणजेच १९०० रुपयांनी वाढून १.५३ लाख रुपयांच्या वर व्यवहार करत आहे, तर चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी चांदीच्या किमती ४ टक्क्यांनी म्हणजेच जवळपास ९,००० रुपयांनी वाढून २.३८ लाख रुपयांच्या वर व्यापार करत आहेत. सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्यासोबतच सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्येही जवळपास ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मंगळवारी चांदीच्या किमती २.२६ लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या आणि सोन्याच्या किमती १.५० लाख रुपयांपर्यंत घसरल्या, त्यानंतर ही वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर निचांकी पातळीवर मोठी खरेदी झाली आहे, त्यामुळे दर वाढल्याचे तज्ञांचे मत आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचे काही भाग तात्पुरते बंद केले आहेत, ज्यातून जगातील २०% कच्चे तेल जाते. याव्यतिरिक्त, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या बातम्या आहेत. सोने आणि चांदीच्या किमती वाढण्यास भू-राजकीय तणाव देखील कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही दिवसात सोने चांदीतील चढउतार कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.