
महाराष्ट्रातील सात जागांसह राज्यसभेच्या 37 रिक्त जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपत असून ते पुन्हा दिल्लीत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रासह ओडिशा, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना 26 फेब्रुवारीला जारी केली जाईल तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च असेल. अर्जांची छाननी 6 मार्चला केली जाणार असून 9 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. संपूर्ण प्रक्रिया 20 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष जांभळ्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
भाजपकडून विनोद तावडे यांना संधी?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रिक्त जागेबाबत त्यांच्या पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. याबाबत आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे सुप्रिया सुळे यांनी आज सांगितले, तर महायुतीमध्ये भाजपच्या वाटय़ाला चार, शिंदे आणि अजितदादा गटाला एक जागा मिळेल अशी शक्यता आहे. भाजपच्या कोटय़ातून रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जागा निश्चित मानली जात आहे. उर्वरित जागांसाठी विनोद तावडे, हंसराज अहीर, सुनील बन्सल यांची नावे चर्चेत आहेत.
पक्षीय बलाबल आणि निवडीचं गणित
राज्यसभेच्या एका जागेसाठी 37.5 मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे 132 आमदार आहेत. शिंदे गटाचे 57, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 10 आमदार व इतर 12 आहेत. ही आकडेवारी पाहता राज्यसभेच्या सात जागांपैकी महायुती सहा जागा जिंकेल, तर महाविकास आघाडी एक जागा जिंकेल असे चित्र आहे.
पार्थ पवार दिल्लीत जाणार?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्या लवकरच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना संधी दिली जाणार की काही वेगळा निर्णय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार?
n शरद पवार n रामदास आठवले n डॉ. फौजिया खान
n डॉ. भागवत कराड n प्रियंका चतुर्वेदी
n धैर्यशील पाटील n रजनी पाटील





























































