
लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट काउंटरवर आणि प्लॅटफॉर्मवर शिस्तबद्ध रांगेत उभे राहून तिकीट/पास घेण्याचे आणि लोकलमध्ये चढण्याचे आवाहन केले. मात्र पश्चिम रेल्वेच्या आवाहनाला प्रवाशांनी केराची टोपली दाखवली. अगोदरच लोकल गाडय़ा कमी आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत गाडय़ा वाढवण्याची गरज असताना प्लॅटफॉर्मवर शिस्तबद्ध रांगेत उभे राहून लोकलमध्ये चढणे शक्य नसल्याचे सांगत प्रवाशांनी रेल्वेच्या उद्घोषणांकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी रेल्वेच्या उपक्रमाचा फज्जा उडाला. विरार, नालासोपारा, वसई स्थानकातून मुंबईत नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यादृष्टीने लोकल गाडय़ांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
उपनगरी रेल्वे मार्गावर सकाळी आणि सायंकाळी प्रत्येक स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. लोकल ट्रेनच्या गेटवर आधीच गर्दी असते. त्यात प्रवाशांना आत चढणे-उतरणे प्रचंड मुश्कील बनते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचे पाय घसरणे, ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या पोकळीत अडकणे असे प्रकार घडतात. अशा घटनांतील संभाव्य जीवितहानी रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या गर्दीला शिस्त लावण्याचे पाऊल उचलले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्लॅटफॉर्मवर रांगांच्या नियोजनाचा उपक्रम सुचवला आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणी बुधवारी सर्वाधिक वर्दळीच्या नालासोपारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 1 वर सुरू करण्यात आली. हा उपक्रम करण्यासाठी रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) जवान प्लॅटफॉर्मवर तैनात राहणार आहेत. रेल्वेच्या कमर्शिअर विभागाचे कर्मचारीही सुरक्षा कर्मचाऱ्यांना मदत करणार आहेत. नालासोपारा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 1ची रुंदी 20 मीटर आहे. या जागेत रांगांचे नियोजन करून प्रवाशांना शिस्त लावण्यात येणार आहे.
उजवीकडून उतरा, डावीकडून आत जा!
सकाळी 6 ते 11 या वेळेत प्लॅटफॉर्मवर रांगांची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. ट्रेनमधून उजव्या बाजूने उतरणे आणि डाव्या बाजूने चढणे हे दर्शवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर विशेष रंगरंगोटी केली आहे. पावलांच्या ठशांचे चित्र काढून प्रवाशांना सूचित केले आहे. प्रवाशांनी रांगांचा नियम पाळावा, यासाठी वेळोवेळी अनाऊन्समेंट केली जाणार आहे. तसेच आरपीएफ, जीआरपी आणि एमएसएफचे जवान गस्त घालतील.
मेट्रो, बसथांब्यांप्रमाणे प्रवाशांच्या रांगा लागणार
मुंबईतील बसथांब्यांवर तसेच मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी रांगेत उभे राहून गाडीत एण्ट्री करतात. तेथे काटेकोर नियम पाळला जातो. त्याच धर्तीवर लोकलच्या स्थानकांत रांगांच्या नियोजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सर्वच स्थानकांत मेट्रो आणि बेस्टच्या बसथांब्यांप्रमाणे प्रवाशांच्या शिस्तबद्ध रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
प्रत्येक प्रवाशाला ट्रेनमधील सीट मिळवण्याची घाई असते. त्यात रेटारेटी, धक्काबुक्की होते. हे टाळण्यासाठीच आम्ही प्लॅटफॉर्मवर रांगा लावून प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये प्रवेश देण्याचे पाऊल उचलले आहे. पुढील काही आठवडय़ांत नालासोपाऱ्यातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर स्थानकांत हा उपक्रम राबवण्यात येईल – पंकज सिंह, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे



























































