स्थायीसह चार विषय समित्यांचे सभापती बिनविरोध; कर्जत नगर परिषदेवर परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत नगर परिषदेमध्ये आज झालेल्या स्थायी समितीसह चार विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि अजित पवार गटाच्या परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली. परिवर्तन आघाडीचे सर्वच सभापती बिनविरोध निवडून आले. नवनिर्वाचित सभापतींवर परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि कर्जतवासीयांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यालयीन अधीक्षक रवींद्र लाड उपस्थित होते. स्थायी समितीमध्ये सात सदस्य असावेत अशी विनंती विरोधी पक्षनेते संकेत भासे यांनी केली. त्यावर मतदान घेण्याची मागणी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी केली. पाच सदस्यांसाठी मतदान घेतले असता १३ सदस्यांनी हात वर करून सहमती दर्शविली, तर सात सदस्यांसाठी आठ सदस्यांनी सहमती दिली. यानंतर विरोधी पक्षाच्या नऊ सदस्यांनी सभात्याग केला, नगरसेविका सुवर्णा जोशी या सभेला अनुपस्थित होत्या. यानंतर विविध समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नवनिर्वाचित सभापतींचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, युवक अध्यक्ष अॅड. स्वप्नील पालकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख बजरंग श्रीखंडे, पंचायत समिती सदस्य निकिता घारे, नीलेश घरत, केतन बेलोसे आदींनी अभिनंदन केले आहे.

आज झालेल्या निवडणुकीमध्ये स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीवर संतोष पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर सुचिता खोत, बीज तसेच सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन व विकास समितीवर महेंद्र चंदन, महिला व बालकल्याण समितीवर हर्षाली गायकवाड, स्थायी समितीवर नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांची सभापती म्हणून निवड झाली आहे.

प्रत्येक समितीमध्ये पाच सदस्य
कर्जत नगर परिषदेची निवडणूक शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवून नगराध्यक्षपदी परिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे यांना निवडून दिले. नंतर झालेल्या महासभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संतोष पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर आज झालेल्या स्थायी आणि विशेष समित्यांच्या निवडणुकीतही परिवर्तन आघाडीने बाजी मारली.