
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला राजस्थानमधील कोटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत ही कारवाई केली.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये संबंधित आरोपीने स्वतःचे नाव राज सिंह असल्याचे सांगितले. त्याने दावा केला होता की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या बजेट अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी गैरवर्तन केले, ज्यामुळे भाजप आणि करणी सेनेचे कार्यकर्ते संतप्त आहेत.
व्हिडीओमध्ये त्याने धमकी दिली की, “जर अशी घटना पुन्हा घडली, तर संबंधित खासदारांच्या घरात घुसून तोडफोड केली जाईल आणि राहुल गांधींना गोळी मारली जाईल.” त्याने २४ तासांत कारवाई न झाल्यास “एक-एक करून सर्वांना गोळ्या घालू,” असा इशाराही दिला होता.
व्हिडीओ व्हायरल होताच कोटा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वीनी गौतम यांनी सांगितले की, आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीवर यापूर्वीच उद्योग नगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये आरोपीच्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांचा फोटो दिसत आहेत.
























































