
सुरू असलेला टी-20 वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्याकडे झेपावत असतानाच 2028 च्या स्पर्धेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सुपर-8 ची लढत सुरू होण्यापूर्वीच तब्बल 12 संघांनी 2028 टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्रता निश्चित केली आहे. सर्वाधिक चर्चा रंगली ती साखळीत बाद होऊनही वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या स्थानाबाबत. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आगामी वर्ल्ड कपचे यजमान असल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि सोबतीला न्यूझीलंडला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आले आहे.
…म्हणून ऑस्ट्रेलियाला थेट एण्ट्री
टी-20 वर्ल्ड कप असो किंवा आयसीसी वर्ल्ड कप, यात यजमान आणि सहयजमान संघाला स्पर्धेत थेट प्रवेश देण्याचा नियम आहे. त्या नियमानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला 12 संघांत स्थान मिळाले आहे. उर्वरित 8 संघ पात्रता फेरीतून निश्चित केले जाणार असल्याची माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली. यंदा सुरू असलेल्या स्पर्धेत हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळताना ऑस्ट्रेलिया ‘ब’ गटात चौथ्या क्रमांकावर राहिला होता. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या सलग पराभवांमुळे त्यांना सुपर-8मध्येही प्रवेश मिळाला नाही. मात्र यजमानपदामुळे 2028 च्या वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्याबाबत त्यांना कोणतीही अडचण उद्भवणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.
सुपर-8 गाठणाऱया संघांना 2028 मध्येही थेट संधी
2026 विश्वचषकात सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवणाऱया सर्व संघांना 2028 मध्येही थेट एंट्री देण्यात आली आहे. यात हिंदुस्थान, वेस्ट इंडीज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. या संघांनी 2026 मधील दमदार कामगिरीच्या जोरावर पुढील स्पर्धेसाठी आपली जागा पक्की केली आहे.
आता आठ जागांसाठी रंगणार लढत
2028 च्या टी 20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 12 जागा निश्चित झाल्या असून उर्वरित आठ जागांसाठी प्रादेशिक पात्रता स्पर्धा होणार आहेत. विविध खंडांतील स्पर्धात्मकतेनुसार या जागांचे वाटप केले जाईल. त्यामुळे अनेक नवोदित आणि उदयोन्मुख संघ 2028 साठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील.
आयसीसी क्रमवारीचा आधारः तीन संघांना अतिरिक्त संधी
सह-मेजबान आणि सुपर-8 संघांव्यतिरिक्त आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीनुसार अव्वल तीन संघांनाही थेट प्रवेश देण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीनुसार बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड या संघांनी 2028 साठी पात्रता निश्चित केली आहे. कट-ऑफ तारखेपूर्वी त्यांचे कोणतेही सामने नियोजित नसल्याने त्यांच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता अत्यल्प आहे.






























































