एक लाईन म्हणजे 50 हजार! दोन लाईन म्हणजे 1 लाख!! झिरवाळांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी सिक्रेट कोडवर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी सिक्रेट कोडवर्डचा वापर केला जातो. स्टिंग ऑपरेशनमध्ये झिरवाळांच्या कार्यालयातील हा प्रकार व्हिडीओद्वारे समोर आला आहे. फाईलवर पेनाची एक लाईन म्हणजे 50 हजार रुपये आणि दोन लाईन म्हणजे 1 लाख रुपये असे कोडवर्ड वापरले जात होते. या प्रकरणात झिरवाळांचे खासगी सचिव डॉ. रामदास गाडे हे ट्रॅप झाले आहेत.

मेडिकल दुकानदार निर्मल शर्मा यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएस ठेवल्यामुळे त्यांचा परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाने एक महिन्यासाठी निलंबित केला होता. त्या आदेशाविरुद्ध त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले होते. त्यावर 13 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली.

शर्मा हे सुनावणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात पोहोचले असता त्यांना डॉ. रामदास गाडे यांच्या केबिनमध्ये बसवून ठेवण्यात आले. लाच घेताना पकडला गेलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे त्यांच्या बाजूला बसला होता. ढेरंगे यांनी शर्मा यांच्यावरील कारवाईची माहिती गाडे यांना दिली. गाडे यांनी फाईल पाहून त्यावर दोन लाईन मारल्या आणि ढेरंगे यांच्यावर पुढील कारवाई सोपवली. त्यानंतर ढेरंगे याने शर्मा यांच्याकडे 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यातील 1 लाख वरच्या अधिकाऱयांना तर 10 हजार स्वतःला असा त्याचा हिशेब होता. पैशांची मागणी करताना त्याचा आवाज व्हिडीओत ऐकू येत आहे.

1 लाख 10 हजार जास्त होतात असे शर्मा यांनी विनंती केल्यानंतर त्यांना 50 टक्के सवलत देण्यात आली. दुपटीने लाच मागायची आणि सवलत देतो सांगून मूळ रक्कम वसूल करायची अशी ही ट्रीक होती. शर्मा यांनी 2 हजार रुपये तत्काळ ऑनलाईन दिले आणि 53 हजार रुपये रोख दिले.

21 तारखेला शर्मा पुन्हा मंत्रालयात गेले. त्यावेळी झिरवाळसुद्धा कार्यालयात होते. मात्र कार्यालयातील कर्मचाऱयांनी शर्मा यांना जाणीवपूर्वक झिरवाळ यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. म्हणजे गाडे आणि ढेरंगेसह इतरही काही कर्मचारी या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे स्पष्ट होते. शर्मा यांना झिरवाळ यांच्याऐवजी गाडे यांच्याकडे पाठवले गेले. शर्मा यांनी या झालेल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केली आहे.

मोतीबिंदूचे कारण सांगून गाडे गायब

लाचखोरीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर डॉ. रामदास गाडे हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे कारण सांगून गायब झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले जाते.