
दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाला नवी झळाळी मिळणार आहे. या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज शिवजयंतीचा योग साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना उपनेता-नगरसेविका विशाखा राऊत आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचे रुपडे पालटणार आहे. सुशोभीकरणामध्ये वृक्षारोपण, लाईट व्यवस्था, दुरुस्ती, डागडुजीसह अन्य अनेक बाबींचा समावेश आहे. मैदानात मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी मातीमध्ये ओलावा कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासंदर्भात आयआयटी मुंबईचा अहवाल आल्यानंतर त्यातील शिफारशींप्रमाणे उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती विशाखा राऊत यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना उपनेते-नगरसेवक मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्यासह शिवसेना आणि मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
असं पालटणार रूपडं…
मैदानाभोवती असलेल्या कट्टय़ावरच्या टाइल्स उखडल्या गेल्या आहेत. त्या काढून संपूर्ण कट्टय़ाला प्लॅस्टर केले जाईल.
वॉकिंग-जॉगिंगसाठी वापरला जाणारा पाथ-वे ओबडधोबड झाल्याने त्याची दुरुस्ती व सपाटीकरण.
– मैदानातील बॉल बाहेर येऊन कुणाला इजा होऊ नये म्हणून उभारलेली जाळी अनेक ठिकाणी फाटली गेल्याने बदलली जाणार.
– बसण्यासाठी संपूर्ण मैदानाभोवती 80 बाकडी.
– माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळय़ाजवळील लॅम्पना पारंपरिक लुक देणार. पाठीमागील म्युरलनाही हायलाइट करणार.
– शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेनिस कोर्टजवळ टॉयलेट.
– आजी-आजोबा उद्यान व माई मंगेशकर उद्यानात नवीन कार्पेट, खेळणी.
– हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावरील कारंज्यांची दुरुस्ती तसेच बाजूला असलेला प्याऊ कार्यान्वित करणार.
– मैदानाच्या परिसरात चेरी ब्लॉसम, बहावाची झाडे लावणार.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढकून करण्यात आला. यावेळी उपनेत्या नगरसेविका विशाखा राऊत, उपनेते नगरसेवक मिलिंद कैद्य, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव ऍड. साईनाथ दुर्गे, नगरसेकिका श्रद्धा जाधव, मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार, शाखाप्रमुख अजित कदम, वैभव रेगे, श्याम जाधव, सुनील रमणी, डॉ. दिनेश साळगाककर उपस्थित होते.
































































