
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर आज जोरदार हल्ला चढवला. महायुती सरकार भ्रष्टाचाराने पोखरले आहे. खोदावे तिथे भ्रष्टाचार आहे, अशी टीका करताना दिल्लीत चिनी बनावटीचा रोबोटीक कुत्रा आम्हीच बनवला असे दाखवणाऱ्या गलगोटीया विद्यापीठासारखीच या सरकारची कामे बनावट आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
स्वतःला गतिमान म्हणणाऱया महायुती सरकारने गेल्या सवा वर्षात फक्त भ्रष्टाचारामध्ये गती पकडली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे काम गलगोटीयासारखे नाही. शिवसेना जे करतेय ते सर्वांना दिसेल. मुंबईत गेल्या तीन वर्षांत सुशोभीकरणच काय, कुठेही एक रस्ता पूर्ण झालेला नाही. सुशोभीकरणाचा 90 टक्के निधी सत्ताधाऱयांच्या कंत्राटदारांकडेच गेला. सुशोभीकरणावर साडेसातशे कोटी रुपये खर्च केले गेले. अनेक ठिकाणी जिथे चांगला रंग दिला होता तिथेच दुबार रंगरंगोटी केली गेली आहे. असे डुप्लिकेट काम डुप्लिकेट सरकारच करू शकते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. दिल्लीतील एआय एक्स्पोमधील गैरव्यवस्थेवरही त्यांनी बोट ठेवले. जगभरात असे समिट होतात, पण तिथे कुठेही राजकीय नेत्यांचे फोटो लावले जात नाहीत, असे ते म्हणाले.
राज्यसभेबाबत चर्चेनंतर निर्णय
आगामी राज्यसभा निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या रोटेशनप्रमाणे राज्यसभेची जागा शिवसेनेच्या उमेदवाराचीच आहे, असे स्पष्ट केले. अद्याप याबाबत काही चर्चा झाली नसून नेत्यांच्या पातळीवर निर्णय होईल, असे ते म्हणाले.
जलपूजन झाले, शिवस्मारकाचे काय?
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दलही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. शिवस्मारकाचे जलपूजन झाले, पण अद्याप कुठेच काही नाही. त्याचप्रमाणे इंदू मिलमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. पण कुठेही काही दिसत नाही. असे ते म्हणाले.
झिरवाळांसारख्या कारवायांमुळे अर्धे सरकार बदलले जाईल
मंत्रालयात गृहखात्याची कारवाई मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकते का, असा प्रश्न त्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात झालेल्या कारवाईवरून उपस्थित केला. लाचखोरांवर खरोखरच अशा कारवाया झाल्या पाहिजेत. त्यातून अर्धे सरकार बदलले जाईल, असे ते म्हणाले.
वरून खालपर्यंत सर्वच बरबटलेले
अल्पसंख्याक शाळांच्या मंजुरी घोटाळ्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘खोदायचे झाले तर सर्वच वरून खालपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. अनेक ट्रस्टमध्ये एक व्यक्ती अल्पसंख्याक म्हणून घेतात. त्यामुळे मग ती ट्रस्ट अल्पसंख्याक म्हणून गणली जात नाही. अनेक मंत्री असे आहेत ज्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत. कुणावर कारवाई करणार? भरमसाट फी आणि डोनेशनवर कुठेही कारवाई झालेली दिसत नाही. त्यावर सरकारने कारवाई केली तर मी सरकारचे जाहीर अभिनंदन करेन.’




























































