
बायोपिकच्या नावाखाली 44 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बॉलीवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन दिला. विक्रम भट्ट सध्या उदयपूर तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना 13 फेब्रुवारी रोजी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
भट्ट दांपत्याविरोधात राजस्थानचे डॉ. अजय मुर्डिया यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, भट्ट दाम्पत्याने त्यांच्या दिवंगत पत्नीच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याच्या नावाखाली त्यांना 30 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यास सांगितले. या बदल्यात त्यांना मोठा नफा होणार असल्याचे आश्वासन दिले. पण आश्वासन पाळले नाही. त्यामुळे भट्ट दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर राजस्थान पोलिसांनी विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला अटक केली होती. आता सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना मध्यस्थीद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी राजस्थान हायकोर्टाने भट्ट यांना दिलासा नाकारला होता. त्यानंतर भट्ट यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

























































