
फेब्रुवारीच्या मध्यावरच राज्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. शिमग्याआधीच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. अचानक तापमानात 3 ते 4 अंशांची मोठी वाढ झाली आहे. विदर्भातील जनता होरपळीने त्रस्त झाली आहे. अनेक भागांत तापमान 37 अंशांच्या पुढे गेले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यातील हवामान अधिक कोरडे होत चालले होते. थंडीची तीव्रता कमी होऊन उन्हाचे चटके बसत आहेत. ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास उन्हातून चालणे नकोसे झाले आहे. अनेक भागांतील कमाल तापमान 37 अंशांच्या पुढे नोंद होत आहे. सकाळी थोडाफार गारवा जाणवतो, मात्र दुपारी 12 नंतर उष्णतेच्या लाटांच्या झळा असह्य करीत आहेत. विदर्भात सर्वसाधारणपणे मार्चनंतर कडक उन्हाळा अनुभवायला मिळतो. यंदा फेब्रुवारीच्या मध्यावरच अनेक शहरांतील तापमानाने चाळिशी गाठली आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला या शहरांमध्ये तापमान उच्चांकाच्या दिशेने उसळी घेत आहे. या वर्षी तापमानाचे नवनवे उच्चांक नोंदवले जाण्याची भीती हवामानतज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत पहाटे गारवा, दिवसभर उकाडा
मुंबईत दिवसा उष्णतेची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. गुरुवारी सांताक्रुझमध्ये 30.5 अंश, तर कुलाब्यात 29.5 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरी पातळीवर होते. तसेच किमान तापमान 20 अंश नोंद झाले. पहाटेच्या सुमारास हवेत गारवा होता. दुपारच्या सुमारास हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकर उकाडय़ाने हैराण झाले. पुढील आठवडाभर शहरातील किमान तापमान 32 ते 34 अंशांदरम्यान, तर किमान तापमान 21 ते 24 अंशांच्या आसपास नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.





























































