
हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 242 वर पोहोचल्याने दृश्यमानता घटली आहे. वाढलेले धुलीकण, धुरके याचा त्रास लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना सोसावा लागत आहे.
मुंबईत शुक्रवारी सकाळी 8 वाजता शहराचे तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वाऱ्याचा वेग ताशी केवळ 3 ते 5 किमी असल्याने प्रदूषणाचे कण हवेतच साचून राहिले आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 64 ते 83 टक्क्यांच्या दरम्यान असल्याने मुंबईकरांना कमालीचा उकाडा आणि अस्वस्थता जाणवत आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 243 वर पोहोचला आहे.
मुंबई आणि परिसरातील विविध केंद्रांवर अतिशय चिंताजनक एक्यूआय नोंदवला गेला आहे. नवी मुंबईत सर्वात जास्त 267 एवढा एक्यूआय नोंदवण्यात आला आहे, तर मालाड पश्चिममध्ये 240, वांद्रे-कुर्ला संकुल येथे 234, चेंबूरमध्ये 230, कांदिवली पूर्व येथे 218, कुर्ला येथे 212, कुलाबा येथे 200 आणि महालक्ष्मी येथे 198 एवढा एक्यूआय नोंदवण्यात आला आहे.
हवेची गुणवत्ता खालावल्याने पश्चिम उपनगरातील रहिवाशांनी सकाळी फिरताना घशात खवखव आणि डोळ्यांची जळजळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Mumbai, Maharashtra: Mumbai’s AQI stands at 242, remaining in severe category, with low visibility observed across several parts of the city pic.twitter.com/n1qSvEjmCN
— IANS (@ians_india) February 20, 2026
हवेच्या गुणवत्तेचे वर्गीकरण –
0-50 – चांगली, हवा स्वच्छ आहे, प्रदूषण नगण्य आहे.
51-100 – समाधानकारक, हवा बऱ्यापैकी स्वच्छ आहे.
101-200 – मध्यम, श्वसनाचे त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी.
201-300 – खराब, जास्त वेळ बाहेर राहिल्यास आरोग्याला धोका.
301-400 – अत्यंत खराब, फुफ्फुसाचे आणि श्वसनाचे गंभीर विकार होऊ शकतात.
401-500 – गंभीर/धोकादायक, निरोगी व्यक्तींवरही गंभीर परिणाम.
काय काळजी घ्यावी?
– ज्येष्ठ नागरिक, मुले आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर जाणे टाळावे.
– बाहेर पडताना एन-९५ (N-95) सारख्या संरक्षक मास्कचा वापर करावा.
– भरपूर पाणी प्यावे आणि आहारात ताज्या फळांचा समावेश करावा.



























































