हिंदुस्थानी नौदलाची ताकद वाढणार! ‘INS अरिधमन’ एप्रिल-मेमध्ये होणार कार्यान्वित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सागरी सुरक्षेसाठी आणि अण्वस्त्र सज्जतेसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. हिंदुस्थानातील नौदलाची तिसरी स्वदेशी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल्स पाणबुडी (SSBN) ‘INS अरिधमन’ (S4) यावर्षी एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. ही पाणबुडी सध्या समुद्री चाचण्यांच्या (Sea Trials) अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्यापर्यंत ती औपचारिकपणे ताफ्यात सामील होईल, असे बोलले जात आहे.

विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल (ATV) प्रकल्पांतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. ही पाणबुडी आधीच्या आयएनएस अरिहंत (INS Arihant) आणि आयएनएस अरिघाट (INS Arighaat) पेक्षा मोठी आणि अधिक प्रगत आहे.

ही अणुपाणबुडी हिंदुस्थानच्या सेकंड स्ट्राईक क्षमतेचा कणा ठरेल. म्हणजेच, जर हिंदुस्थानवर अण्वस्त्र हल्ला झाला, तर समुद्रात खोलवर दडलेली ही पाणबुडी शत्रूवर भीषण प्रतिहल्ला करू शकेल. या पाणबुड्यांची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्या शत्रूच्या नजरेत न येता अनेक महिने पाण्याखाली राहू शकतात, कारण त्यांना वारंवार पृष्ठभागावर येण्याची गरज नसते.

या पाणबुडीची निर्मिती खासगी क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रोने केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पाणबुडीच्या कडक समुद्री चाचण्या सुरू आहेत. नौदलात सामील झाल्यानंतर ती स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) अंतर्गत कार्यरत होईल.