प्रदूषण, धुरके, उकाडा… मुंबईकरांचा श्वास कोंडला! मुंबईची हवा अत्यंत खराब, आरोग्याला घातक, गुणवत्ता निर्देशांक पोचला 344 अंकांच्या पातळीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले कित्येक दिवस प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईची हवा शुक्रवारी अत्यंत खराब आणि आरोग्याला अतिधोकादायक श्रेणीत पोहोचली. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 344 अंकांच्या पातळीवर गेला. हवेत प्रचंड धुरक्याचे साम्राज्य पसरले. आर्द्रतेच्या अतिप्रमाणामुळे उकाडा वाढला. त्यामुळे शुक्रवारी मुंबईकरांची अक्षरशः श्वास काsंडल्यासारखी घुसमट झाली. नागरिकांना तोंडावर मास्क लावून कार्यालय गाठावे लागले.

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरात तीव्र वायू प्रदूषणाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही आठवडय़ांत 200 ते 250 अंकांच्या पातळीवर गेलेला एक्यूआय शुक्रवारी सकाळी थेट 344 अंकांवर पोहोचला. ही हवेच्या गुणवत्तेची अत्यंत खराब आणि आरोग्याला घातक पातळी असल्याचे हवामानतज्ञांनी सांगितले. पहाटे हवेत धुरक्याची चादर पसरली होती. दक्षिण, मध्य मुंबईबरोबरच पश्चिम आणि पूर्व उपनगरांत दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. पीएम-2.5चे प्रमाण प्रति घनमीटर 181 मायक्रोग्रॅम होते. तसेच पीएम-10चे प्रमाण प्रति घनमीटर 210 मायक्रोग्रॅम नोंदवले. वरळी, प्रभादेवी परिसरात इतर भागांच्या तुलनेत जास्त धुरके होते. वांद्रे-वरळी सागरी सेतू, कोस्टल रोडवरून धावणाऱया गाडय़ांना सकाळी 11 वाजेपर्यंत कमी दृश्यमानता असलेल्या वातावरणाचा सामना करावा लागला. नागरिकांनी अंगाची लाहीलाही आणि अस्वस्थतेचा त्रास सहन केला. सकाळी 8 वाजेपर्यंत तापमान 25 अंशांच्या घरात गेले होते. किमान तापमानातील ही वाढ डोकेदुखीची ठरली.

मुंबईसह नवी मुंबईत चिंताजनक ‘एक्यूआय’

मुंबईबरोबरच नवी मुंबईतील अनेक भागांत अतिशय चिंताजनक ‘एक्यूआय’ नोंदवला. वडाळा, शिवडीपासून अगदी बेलापूर, उरणपर्यंत हवेची गुणवत्ता अतिघातक होती. नवी मुंबईत 267 अंकांवर एक्यूआयची नोंद झाली. तसेच मुंबई शहरात मालाड पश्चिम-240, वांद्रे-कुर्ला संकुल-234, चेंबूर-230, कांदिवली पूर्व-218, कुर्ला -212, कुलाबा-200 आणि महालक्ष्मीमध्ये 200 अंकांपर्यंत एक्यूआय पोहोचल्याने नागरिकांची प्रचंड घुसमट झाली. दमा तसेच श्वसनाच्या इतर विकारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना तुलनेत जास्त त्रास झाला. प्रदूषित हवेमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.