
एका अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे एक चार वर्षीय चिमुरडा रात्रभर अंगणवाडीच्या खोलीतच कोंडला गेला. मुलगा बेपत्ता झाल्याने परिसरात अपहरणाची चर्चा पसरली होती. पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली, मात्र रात्रभर शोध घेतल्यानंतर मुलगा सुखरूप आढळला. यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नागपूर जिह्यातील खापरखेडा येथील बोरकर लेआऊटमध्ये असलेल्या अंगणवाडीत हिमांशू नावाचा चार वर्षीय मुलगा शिकायला जातो. 19 फेब्रुवारी रोजी शाळेच्या वेळेत हिमांशू खेळता खेळता एका कोपऱ्यात झोपी गेला. अंगणवाडी सुटण्याची वेळ झाली असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी वर्गखोलीत कोणी आहे की नाही याची कोणतीही तपासणी न करता कुलूप लावले.
सकाळी पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः अंगणवाडीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. कुलूप उघडताच हिमांशू तिथे सुरक्षित आढळला.
अपहरणाची वर्तवली शक्यता
मुलगा वेळेवर घरी न परतल्याने पालक घाबरले. त्यांनी परिसरात शोधाशोध करूनही हिमांशूचा पत्ता लागला नाही. त्यामुळे अपहरणाची भीती व्यक्त केली जात होती. पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून खापरखेडा पोलिसांनी तपासासाठी सात पथके तैनात केली. पोलिसांनी रात्रभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तलाव आणि नाल्यांच्या परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र हिमांशूचा सुगावा लागला नाही.
हिमांशूची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र या प्रसंगामुळे तो कमालीचा घाबरलेला होता. याप्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकेची चौकशी सुरू असून तिच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.





























































