शासकीय मुद्रणालयातील आंदोलनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मोठा फटका, 25 फेब्रुवारीला एक दिवसाचा संप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालयातील कर्मचाऱयांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मोठा फटका राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बसणार आहे. कारण शासकीय मुद्रणालयात सध्या दररोज दोन तास धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या छपाईवर मोठा परिणाम होत आहे.

राज्याच्या उद्योग विभागाच्या अखत्यारित  आठ शासकीय मुद्रणालये आहेत. चर्नी रोड स्टेशनच्या बाहेर मुख्यालय आहे. त्याशिवाय नागपूर, पुणे, वाई, कोल्हापूर, संभाजीनगरमध्ये शासकीय मुद्रणालये आहेत.  या सर्व मुद्रणालयांमध्ये विविध मंजूर पदांची संख्या सुमारे 2 हजार 700 आहे, पण सध्या सोळाशे ते सतराशे कर्मचारी आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणत्या

पदांचा आढावा, ठप्प असलेली कामगार भरती पुन्हा सुरू करणे, मुद्रण भत्त्यात वाढ, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयांच्या निवृत्तीवेतनातून होणारी वसुली थांबवावी. दुसरा व चौथा शनिवार सुट्टी मिळणे.

दररोज दोन तास आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱयांचे सध्या दररोज दुपारी धरणे आंदोलन सुरू आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 25 तारखेला एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्न्मेट प्रेसेस एप्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष राहुल कडू व सुनील रासम यांनी दिला आहे.